रहिमतपूरचे व्यापारी रविराज लोखंडेंचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

कळंबीनजीकच्या दूध डेअरीजवळ वाहन अडवून अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला.

औंध : कळंबी (ता. खटाव) येथे भररस्त्यावर काल (ता. 16) रात्री अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार केल्याने रहिमतपूरमधील व्यापाऱ्याचा खून झाला. रविराज बाळकृष्ण लोखंडे (वय 41) असे मृताचे नाव असून खुनामागील कारणाचा उलगडा न झाल्याने गूढ निर्माण झाले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविराज लोखंडे हे मागील काही वर्षांपासून औंध, पुसेसावळी परिसरात बेकरी पदार्थांची विक्री करत होते. आपल्या वाहनातून फिरून ते हा व्यवसाय करत होते. नेहमीप्रमाणे काल रात्री आपले काम आटोपून ते टेंपोने परत कळंबीमार्गे रहिमतपूरकडे निघाले होते. त्यावेळी कळंबीनजीकच्या दूध डेअरीजवळ वाहन अडवून अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार केल्याने रविराज हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

ही घटना समजताच कळंबी ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. गंभीर जखमी अवस्थेत रविराज यांना औंध येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मूत्यू झाला. पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची फिर्याद सुनील लोखंडे यांनी औंध पोलिस ठाण्यात दिली असून औंध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahimatpur businessman Raviraj Lokhande murdered