राहुल बडस्करच्या यंत्राला राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

उंब्रज - जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात येथील महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी राहुल लक्ष्मण बडस्कर याने तयार केलेल्या बहुउद्देशीय यंत्राद्वारे भुईमूग शेंगा तोडणी, मका, सूर्यफूल सोलणी व बटाटा, बीट, गाजर, काकडी, चिप्स व कांदा चिरणी यंत्राला राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला. या यंत्राची निवड दिल्ली येथे होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील टेहू (ता.पारोळा) येथील वसंतराव मोरे तंत्रनिकेतनमधील विज्ञान प्रदर्शनात महात्मा गांधी विद्यालयाने बहुउद्देशीय यंत्र सादर केले. हे यंत्र इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी राहुल बडस्कर याच्या कल्पनेतून तयार करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनात राज्यातून २५२ उपकरणे सहभागी झाली होती. १९ उपकरणांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली. त्यामध्ये महात्मा गांधी विद्यालयाने सादर केलेल्या बहुउद्देशीय उपकरणास प्रथम क्रमांक मिळाला.

यावेळी परीक्षक म्हणून राज्य विज्ञान मंडळाचे सदस्य विलास आटोळे, राज्य विज्ञान मंडळाचे समन्वयक प्रियांका खोले, मधुरा पाटील, प्रतिमा गैवने, शेखर पाटील यांनी काम पाहिले. या यंत्राचा उपयोग बळ व इंधनाची बचत होण्यासाठी होणार आहे. तसेच सद्य:परिस्थितीला शेतमजुरांची संख्या कमी झाल्यामुळे या यंत्राचा चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. वाहतुकीस व दळणवळण करण्यासाठी सुलभ असे हे उपकरण असून वेळेची व होणारे प्रदूषण कमी करण्यास मदत करणार आहे. हे उपकरण अत्यल्प खर्चात तयार होते. उपकरण निर्मितीसाठी प्राचार्य एस. जे. जाधव, उपप्राचार्य एस. व्ही. पाटील, पर्यवेक्षक एम. एस. पाटील यांनी प्रेरणा दिली. यंत्राच्या जोडणीचे काम हैदर जमादार यांनी केले. विज्ञान शिक्षक आर.जे. जाधव, अन्य शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Rahul Badaskar Machine Inspire Award