वडिलांचा अंत्यविधी आटोपून थेट रंगमंचावर एंट्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - राहुल पाटील. एक हरहुन्नरी कलाकार. येथील हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर तो गेली आठ ते दहा वर्षे काम करतोय. रसिकांना पोट धरून हसवतानाच अंतर्मुख करणाऱ्या ‘सोकाजीराव टांगमारे’ नाटकात त्याच्या छोट्याशाच, पण महत्त्वाच्या भूमिका. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याचे वडील अमृत पाटील यांचे निधन झाले; मात्र अंत्यसंस्काराचा विधी आटोपून तो थेट संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आला आणि आपली भूमिका तितक्‍याच नेटाने करून पुन्हा घरी गेला. ‘सोकाजीराव’चा कोल्हापुरात बराच काळ प्रयोग नसल्याने आज प्रयोगाचे आयोजन केले होते.

कोल्हापूर - राहुल पाटील. एक हरहुन्नरी कलाकार. येथील हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर तो गेली आठ ते दहा वर्षे काम करतोय. रसिकांना पोट धरून हसवतानाच अंतर्मुख करणाऱ्या ‘सोकाजीराव टांगमारे’ नाटकात त्याच्या छोट्याशाच, पण महत्त्वाच्या भूमिका. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याचे वडील अमृत पाटील यांचे निधन झाले; मात्र अंत्यसंस्काराचा विधी आटोपून तो थेट संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आला आणि आपली भूमिका तितक्‍याच नेटाने करून पुन्हा घरी गेला. ‘सोकाजीराव’चा कोल्हापुरात बराच काळ प्रयोग नसल्याने आज प्रयोगाचे आयोजन केले होते. प्रयोग हाऊसफुल्ल झाला; पण त्यामागे घडलेल्या गोष्टी साऱ्यांनाच थक्क करणाऱ्या. 

नाटकातील राहुलसह प्रमोद फडतरे या दोन्ही कलाकारांच्या वडिलांची प्रकृती गंभीर. त्यामुळं सारीच टीम टेन्शनखाली. प्रमोदच्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे; मात्र दुपारी बाराच्या सुमारास राहुलच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी आली. त्यामुळं टेन्शन आणखीच वाढले. राहुल नाटक करू शकणार नसल्याने पूर्वी काम करणाऱ्या स्वप्नील यादव याला बोलावून आणले. पुन्हा रिहर्सल सुरू झाली. या नाटकाच्या पहिल्या अंकात राहुलची ‘कोऱ्या’ची तर दुसऱ्या अंकातील भूमिका ‘कोकिळे’ची. नाटकाच्या प्रयोगाची सायंकाळी साडेचारची वेळ झाली आणि दरम्यान राहुलच्या वडिलांवरील अंत्यसंस्काराचा विधीही पूर्ण झाला. नाटकाचा पहिला अंक सळसळत्या उत्साहात सुरू झाला आणि राहुलचाच फोन आला. ‘‘कोकिळेची भूमिका अवघड आहे. त्यामुळे दुसऱ्या अंकात मी काम करायला येतोय,’’ असा त्याचा निरोप. काही क्षणातच तो नाट्यगृहात आला. पटापट रंगभूषा-वेशभूषा करून त्याने रंगमंचावर कोकिळेची एंट्री घेतली आणि तितक्‍याच प्रभावीपणे ती पेलली. नाटक संपले आणि साऱ्या गोष्टींचा उलगडा होताच गहिवरून आलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांनी राहुलच्या रंगभूमीवरील या प्रेमाला सलामच केला.

अजब टीम स्पिरीट
फिनिक्‍स क्रिएशन्स ही संस्था म्हणजे एक अजब ‘टीम स्पिरीट’. राज्य नाट्य असो किंवा व्यावसायिक रंगभूमीवर ही संस्था अनंत अडचणींवर मात करत आपला पाय घट्ट रोवून उभी आहे. निर्मात्यापासून ते थिएटरच्या भाड्यापर्यंतच्या अडचणींचा डोंगर न संपणारा; पण जिद्दीने या संस्थेने अनेक प्रयोग केले आणि त्यातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ दिले. राहुल याच टीमचा शिलेदार. त्यामुळेच त्याच्या नसानसांत ‘शो मस्ट गो ऑन’ चा संस्कार भिनलेला.

Web Title: Rahul Patil Actor Theater Entry