राहुल सुतार यांच्या चित्रांचे जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

एक नजर

  • कोल्हापुरातील राहुल संजय सुतार या अवघ्या २७ वर्षे वयाच्या कलाकाराच्या चित्रांचे १७ ते २३ जून मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन
  • ‘प्रवास निसर्गासोबतचा’ या संकल्पनेवर आधारित त्याची तैलरंगातील चित्रे

 

कोल्हापूर - मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवण्याची संधी म्हणजे कलाकारांच्या जीवनातील अत्युच्च संधी मानली जाते. कोल्हापुरातील राहुल संजय सुतार या अवघ्या २७ वर्षे वयाच्या कलाकाराला १७ ते २३ जून या कालावधीसाठी ही संधी मिळाली आहे.

‘प्रवास निसर्गासोबतचा’ या संकल्पनेवर आधारित त्याची तैलरंगातील चित्रे जहाँगीरच्या गॅलरीत झळकणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा पश्‍चिम भाग व कोकण असा साधारण सहा हजार किलोमीटरचा प्रवास मोटारसायकलवरून करताना हा निसर्ग आपल्या कुंचल्यातून साकारला आहे. 

कलानिकेतनमध्ये एटीडी झालेल्या राहुलच्या चित्रांचे प्रदर्शन यापूर्वी शाहू स्मारक भवन व नेहरू सेंटर आर्ट गॅलरी मुंबई येथे भरले आहे. त्याच्या सर्व चित्रांत केवळ आणि केवळ निसर्ग आहे. मानव निर्मित घटकांचा या चित्रात केवळ अपवादाने समावेश आहे. राहुलने सांगितले की, निसर्गाचा महिमा खूप वेगळा आहे. तो शब्दात, रंगात जसाच्या तसा पकडताच येणार नाही; पण मी निसर्गात भटकंती करताना जो कॅन्व्हास माझ्यासमोर आला, तो रंगाच्या माध्यमातून प्रतिबिंबीत करण्याचा प्रयत्न केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Sutar Painting exhibition in Jahangir art gallery