गर्भलिंग चाचणी करणाऱ्या बनावट डॉक्‍टरवर छापा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - गर्भलिंग तपासणी आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कितीही कठोर कायदा केला असला, तरी गर्भलिंग तपासणीचे प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. डोंगराळ भागात एका कौलारू घरात दहावी उत्तीर्ण असलेला एक जण गर्भलिंग चाचणी करत असल्याचे गर्भलिंग चाचणीविरोधी पथकाने छापा घालून उघडकीस आणले आहे. या प्रकरणी थेट न्यायालयातच गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

कागल तालुक्‍यातील सावर्डे गावाजवळील पिराचीवाडी या डोंगर वस्तीतील एका कौलारू घरात गर्भलिंग चाचणी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी पथकाच्या साहायाने एका दांपत्याला गर्भलिंग चाचणीसाठी तयार केले. या दांपत्याने बुधवारी (ता. 1) रात्री आठ वाजता संबंधितांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्या वेळी दांपत्याला रात्री दहा वाजता केनवडे फाट्यावर यायला सांगितले. तेथे अगोदरपासून काही जण थांबले होते. त्यांनी दांपत्याला पिराचीवाडी येथील कौलारू घरात आणले. तोपर्यंत पथकातील लोकही तेथे पोचले. स्वतःला डॉक्‍टर समजणाऱ्या व प्रत्यक्षात दहावीपर्यंत शिकलेल्या व्यक्तीला संशय आल्याने अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला. 

पथकाने त्या घरात प्रवेश करून छापा टाकला. तेथे आणखी तीन दांपत्य, तसेच मदतनीस महिलाही होती. त्यांना ताब्यात घेऊन पहाटे साडेपाचपर्यंत चौकशी केली. पळून गेलेल्या व्यक्तीकडे वैद्यकीय पदवी नसल्याचे व तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. 

सांकेतिक भाषेतील चिठ्या 
गर्भलिंग चाचणी केल्यानंतर संबंधित व्यक्ती दांपत्याला सांकेतिक भाषेत चिठ्ठी देत असे. चिठ्ठीवर इंग्रजीमध्ये 9 हा अंक लिहिला, तर मुलगी आहे व इंग्रजी 7 अंक लिहिला, तर मुलगा समजले जात होते. संबंधित व्यक्ती केवळ गर्भलिंग चाचणीच करत नव्हता, तर तेथे गर्भपातही केले जात असावेत, असा संशय पथकाला आहे. 

Web Title: A raid on fake doctor