कोल्हापूर : गावठी बंदूक कारखान्याचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - शिवडाव पैकी वांजोळेवाडी (ता. भुदरगड) येथे शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून बंदुका तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणी गोविंद महादेव सुतार (वय ३५) याला अटक केली. त्याच्याकडून १२ बोअरच्या गावठी बंदुका, तसेच त्या तयार करण्याचे साहित्य असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कोल्हापूर - शिवडाव पैकी वांजोळेवाडी (ता. भुदरगड) येथे शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून बंदुका तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणी गोविंद महादेव सुतार (वय ३५) याला अटक केली. त्याच्याकडून १२ बोअरच्या गावठी बंदुका, तसेच त्या तयार करण्याचे साहित्य असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

विधानसभा निवडणूक व गणेशोत्सवाच्या तोंडावर अवैध शस्त्रविक्री करणाऱ्यांवर शाहूपुरी पोलिसांची करडी नजर होती. गुन्हेशोध पथकातील हवालदार वसंत पिंगळे यांना शहरात एकजण १२ बोअर गावठी बंदूक विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवन मोरे यांच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात काल (ता. १) सायंकाळी सापळा रचला. परीख पुलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून एक तरुण पायी जात होता. त्याच्या हातात गोणपाट होता. याचा पथकाला संशय आला. पथकाने त्याला पकडले. गोणपाटात त्यांना एक १२ बोअरची गावठी बंदूक सापडली. पोलिसांना त्याने आपले नाव गोविंद महादेव सुतार (वय ३५, रा. शिवडाव पैकी वांजोळेवाडी, ता. भुदरगड) असे सांगितले. 

सुरवातीला त्याने बंदुकीबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यावर त्याने बंदूक घरी तयार केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याच्या घरातील बंदूक कारखान्यावर छापा टाकला. त्यात त्यांना चार आणि शेतातील शेडमध्ये चार अशा आणखी आठ १२ बोअरच्या गावठी बंदुका सापडल्या. त्यासह अन्य यंत्रसामग्री असा पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. न्यायालयाने त्याला आज चार दिवसांची कोठडी सुनावली. त्याच्याकडून आणखी चार बंदुका हस्तगत होण्याची शक्‍यता आहे. 

तपासाचे शिलेदार
पोलिस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक पवन मोरे, सहायक फौजदार संदीप जाधव, कर्मचारी वसंत पिंगळे, प्रथमेश पाटील, विशाल चौगले, अशोक पाटील, किरण वावरे, युवराज पाटील, प्रशांत घोलप, नारायण कोरवी, विनायक फराकटे, धर्मेद्र बगाडे यांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

शिकारीसाठी बंदुकांचा वापर?
गोविंद कधीपासून बंदुका तयार करीत होता, त्याने त्या कोणाला विकल्या, संबंधितांनी बंदुकांसाठी लागणारी काडतुसे कोणाकडून खरेदी केली, बंदुकांचा वापर कशासाठी केला, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. गोविंदच्या घराभोवतीचा परिसर जंगलमय असल्याने बंदुकांचा वापर वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठीही केला गेला असावा, या अनुषंगानेही तपास सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

संशयित कारागीर
संशयित गोविंद सुतार आहे. त्याचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले. त्याच्याकडे मोटारसायकल दुरुस्तीचेही कौशल्य आहे. परवानाधारक बंदुका त्याच्याकडे दुरुस्तीसाठी येत होत्या. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याने बंदुका तयार केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raid on Gun Factory in Bhudargad Taluka