मुश्रीफ हे फकीर, काहीही सापडणार नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

श्री. मुश्रीफ हे फकीर आहेत, त्यामुळे त्यांच्या घरात काहीही सापडणार नाही, अगदीच सापडलीत तर मोरांची पिसे सापडतील. 

- भैय्या माने

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी भारतीय जनता पक्षातील प्रवेशाची ऑफर नाकारल्यानेच त्यांच्या घर, कारखान्यावर आयकर विभागाचा छापा पडला असल्याचे आरोप जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केला. श्री. मुश्रीफ हे फकीर आहेत, त्यामुळे त्यांच्या घरात काहीही सापडणार नाही, अगदीच सापडलीत तर मोरांची पिसे सापडतील, असेही श्री. माने म्हणाले. 

श्री. माने हे मुश्रीफ यांचे खंदे समर्थक आहेत. श्री. मुश्रीफ यांच्यावरील कारवाईनंतर श्री. माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,"गेल्या आठवड्यातच भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी श्री. मुश्रीफ यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले होते. पण श्री. मुश्रीफ यांनी शरद पवार हेच आपले दैवत असल्याचे सांगत ही ऑफर धुडकावून लावली. त्या रागातूनच त्यांच्या घर व निवासस्थानी आयकर विभागाचे छापे पडले आहेत.' 

श्री. माने म्हणाले,"कारखान्याला 40 हजार सभासदांनी प्रत्येकी दहा हजार रूपयांची रक्कम दिली आहे. यापुर्वीही यासंदर्भात तक्रार झाल्यानंतर चौकशी झाली होती, त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. आता पुन्हा आयकर विभागामार्फत सुरू असलेली चौकशी म्हणजे त्रास देण्याचा उद्देश आहे, आताही काही सापडणार नाही.', असा विश्वासही श्री. माने यांनी व्यक्त केला. 

श्री. माने म्हणाले,"निरव मोदी, मेहुल चौक्‍सी, विजय मल्ल्यासारखे उद्योजक कोट्यावधी रूपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेले. त्यांना परत आणण्याचे धाडसही सरकारमध्ये नाही. पण दुसरीकडे भाजप प्रवेशाची ऑफर नाकारली म्हणून आयकराचे छापे टाकले जात आहेत, याचे जनताच योग्य उत्तर देईल.' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on MLA Hasan Mushrif house Bhaiya Mane comment