कुरुंदवाडमध्ये दहा सावकारांच्या घरावर छापे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

सावकारांनी ठोकली धूम 
कारवाईची माहिती मिळताच हा व्यवहार करणाऱ्या काही सावकारांनी घरातील कागदपत्रांसह धूम ठोकली. तथापि कारवाईसाठी गेलेल्या पथकांनी अशा सावकारांच्या घरातच ठाण मांडले होते. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. 

कुरुंदवाड - शिरोळ तालुक्‍यातील कुरुंदवाडमध्ये दहा खासगी सावकारांच्या घरावर सहकार विभागाने छापे टाकले. कारवाई झालेल्यांमध्ये राजकीय पदाधिकारी, व्यावसायिक, सहकारी संस्थेचे पदाधिकारी आदींचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. रोख साडेनऊ लाखांसह अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, निनावी धनादेश, सह्या असलेले कोरे स्टॅम्प पेपर, सोन्याचांदीचे दागिने, भिशीचे साहित्य सापडले आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई झाली आहे. 

जिल्हा सहकार निबंधक अरुण काकडे व सांगली जिल्हा उपनिबंधक नीलकांत करे, शिरोळचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे, पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेडे यांच्या पथकाने कारवाई केली. दरम्यान, कुरुंदवाड पोलिस ठाण्यात या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

अज्ञात व्यक्तीने या दहा खासगी सावकारांविरोधात लेखी तक्रार जिल्हा निबंधकांकडे केली होती. त्यानुसार जिल्हा निबंधक अरुण काकडे यांनी या निनावी अर्जाची शहानिशा करून कारवाईचे निश्‍चित केले. एकाच वेळी दहा पथके 
तयार केली. प्रत्येक पथकात सहकार विभागाचे पाच कर्मचारी व दोन पोलिस यांचा समावेश होता. खासगी सावकारांच्या घरावर गुरुवारी सकाळपासून कारवाई सुरू केली. तब्बल पाच तास कारवाई सुरू होती. 

शिरोळ तालुक्‍यात मोठ्या संख्येने खासगी सावकार आहेत. यापैकी बहुतांश सावकारांची नोंदणीच सहकार  विभागाकडे नाही. सावकारी करायची असेल तर त्यासाठी सहकार विभागाचा परवाना घेणे आवश्‍यक आहे. हा परवाना मिळवण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत, बॅंक खात्याची माहिती, कर्ज देण्याची क्षमता, बॅंक गॅरंटी यासारखी माहिती सहकार विभागाला द्यावी लागते. त्यानंतर सहकार विभागाकडून अशा सावकारांना व्याज किती आकारावे, त्याची मुदत काय असेल या अटी-शर्तीसह परवाना दिला जातो. 

शिरोळ तालुक्‍यात काही सावकारांकडे असे अधिकृत परवाने आहेत; पण यापैकी बहुतांश जणांनी परवाना देताना घातलेल्या अटी-शर्तींचा भंग करताना अवाच्या सव्वा व्याजआकारणीचा सपाटा लावला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर सावकारही तालुक्‍यात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून तर शेतकरी वर्गाची पिळवणूक सुरू आहे. सोन्याचांदीचे दागिने गहाण ठेवून कर्जे दिली आहेत. हे सर्व सावकार बेकायदेशीररीत्या हा व्यवसाय करत होते.  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच झालेल्या या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 

चौकशी करून गुन्हे दाखल होणार
ज्या सावकारांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या त्यांच्या घरातून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांना या सावकारांनी कर्जे  दिली, त्यांच्याकडेही चौकशी करून संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

सावकारांनी ठोकली धूम 
कारवाईची माहिती मिळताच हा व्यवहार करणाऱ्या काही सावकारांनी घरातील कागदपत्रांसह धूम ठोकली. तथापि कारवाईसाठी गेलेल्या पथकांनी अशा सावकारांच्या घरातच ठाण मांडले होते. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. 

Web Title: Raids on ten money lender houses in Kurundwad