रेल्वे महाव्यवस्थापकांचा मिरज दौरा ठरला कोरडाच

Railway General Manager's Miraj tour not fruitfull
Railway General Manager's Miraj tour not fruitfull

मिरज (जि. सांगली) : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील स्थानकांच्या पाहणी दौऱ्यासाठी आलेले मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांचा दौरा म्हणजे निव्वळ एक नौटंकी ठरली. या दौऱ्यात रेल्वे महालक्ष्मी एक्‍सप्रेसची मागणी वगळता प्रवाशांना अपेक्षित असलेल्या महत्त्वाच्या मागण्यांपैकी एकही मागणी मान्य झाली नाही. चाकरमान्यांसाठीच्या गाड्यांचा तर साधा उल्लेखही महाव्यवस्थापक मित्तल यांनी केला नाही. कोटीभर रुपयांचा चुराडा करून त्यांचे शाही थाटात स्वागत झाले खरे; पण ज्यांच्या खिशातील पैशांतून हे सारे घडले, त्या चाकरमानी प्रवाशांना या महाव्यवस्थापकांनी नेमके काय दिले याची चर्चा आता रंगणार आहे.

कोरोना लॉकडाऊनमध्ये ठप्प झालेली रेल्वे प्रवासी वाहतूक अद्यापही रुळावर नाही. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने कोल्हापूर, बेळगाव, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, कऱ्हाड, सातारा, सलगरे येथील किमान वीस ते पंचवीस हजार प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. रेल्वे वाहतूक बंद असल्याने रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. साहजिकच रस्त्यावरील अपघातांमध्ये ठार होणाऱ्यांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होते आहे. याची जाणीव लोकप्रतिनिधींनी करून दिल्यानंतरही महाव्यवस्थापक मित्तल यांनी यांच्या चेहऱ्यावरील साधी रेषही हालली नाही.

वास्तविक सांगली, मिरज कोल्हापुरातील हजारो प्रवाशांसाठी एखादी पॅसेंजर किंवा डेमू तातडीने सोडणे नितांत गरजेचे असताना, मुंबईला जाणारी महालक्ष्मी एक्‍सप्रेसही नाव बदलून सुरू करून आपल्या बाबुगिरीची झलकच सर्वांना दाखविली. 

मिरज रेल्वे स्थानकावरील समस्यांबाबत तर आता सगळ्यांनी हात टेकल्यासारखीच स्थिती आहे. सुरक्षा व्यवस्थेची झालेली वाताहत, स्थानकासमोरील मॉलचे रखडलेले काम, रिक्षाचालकांसाठीचा थांबा, यासह प्रवाश्‍यांसाठीच्या अनेक सुविधांची असलेली वानवा याबाबतही स्थानिक अधिकाऱ्यांनी केलेल्या पोपटपंचीवरच विश्वास ठेवण्यावरच महाव्यवस्थापक मित्तल यांनी समाधान मानले. गेल्या दीड दोन वर्षांपासून या दौऱ्याची चर्चा सुरू होती. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून रंगरंगोटीसह अनेक थातुरमातुर कामे करण्यात आली. ज्याचा सामान्य प्रवाश्‍यांना काही उपयोग नाही. त्यामुळे एकूणच महाव्यवस्थापक मित्तल यांचा दौरा म्हणजे निव्वळ एक नौटंकी ठरली, याबाबत यापुढे सातत्याने वादग्रस्त चर्चा होत राहणार आहे. 

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार
स्थानिक पातळीवरील रेल्वे प्रवासी वाहतूक बंद असल्याने रस्त्यावरील अपघातांमध्ये चिंताजनक वाढ होऊ लागली आहे. यामध्ये अनेकांचा बळी जाऊन अनेकजण जायबंदी होत आहेत. याचा विचार करून तरी महाव्यवस्थापक मित्तल हे स्थानिक गाड्यांबाबत काहीतरी ठोस आश्वासन देतील अशी अपेक्षा होती. त्यांनी मागण्यांबाबत विचार केला नाही तर आम्ही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून यांची भेट घेणार आहोत. 
- मकरंद देशपांडे, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी कृती समिती मिरज 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com