क्रांतीसिंह नाना पाटील यांनी ब्रिटीशांची रेल्वे लुटलेल्या घटनेला 75 वर्षे पूर्ण

satara
satara

रेठरे बुद्रुक (सातारा) : प्रतिसरकारने दिलेल्या लढ्याच्या आठवणी आजही भागात ताज्या आहेतच. प्रती सरकार चालवण्यासाठी क्रांतीसिंह नाना पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रिटीशांचे पगार घेवून निघालेलली रेल्वेची लूट केली. ती लूट म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अत्यंत पराकोटीच्या साहसापैकी एक. शेणोली येथे ब्रिटीशांच्या रेल्वे लुटीला गुरूवारी (ता. 7) 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या आठवणी आजही त्या भागात ताज्या आहेत. 

ब्रिटीश राजवटीविरोधात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारने लढा दिला. ते प्रतिसरकार चालवण्यासाठी पैशाची गरज होती. त्यासाठी जुलूमी ब्रिटीशांच्या खजिन्याला त्यांनी लक्ष्य केले होते. नाना पाटील, क्रांतीअग्रणी जी. डी. लाड, क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी व तेरा सहकाऱ्यांनी रेल्वेच्या लुटीची कल्पना लढवली. 7 जून 1943 ला शेणोली जवळील गड खिंडीत ती कल्पना प्रत्यक्षात उतरवत इंग्रजांची पगार गेवून येणारी रेल्वेच त्यांनी लुटली. ब्रिटीशांचा खजिना लुटणे खरेतर अदभूत घटना आहे. शेणोली ते येडेमच्छिंद्र या दरम्यान कऱहाड-तासगाव रस्त्यावरील गडखिंडीत नाना पाटील, जी. डी. लाड, क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांच्यासह तेरी सहकाऱयांनी साहसी पराक्रम केला. त्यांनी ब्रिटीशांचा खजिना लुटताना पूर्व नियोजीत आखलेली रुपरेषा, रेल्वेचा वेग मंदावणारे ठिकाण व अवघड मार्ग, खजिना लुटण्याची वेळ, ताकारी रेल्वे स्टेशनपासून गाडी गडखिंडीपर्यंत पोचेपर्यंत एकमेकांना खूणवण्यासाठीच्या इशाऱयांची पूर्वतयारी याचा सराव लूटीपूर्वी पंधरा दिवस आधीच केला होता.

इंग्रज राजवटीमधील शासकीय अधिकारी व कर्मचाऱयांच्या पगाराचा जमा झालेला सरकारी खजिना मिरज येथून रेल्वेने पुण्याला दरमहा नेला जायचा. दर महिन्याच्या एक ते दहा तारखेच्या दरम्यान पगाराची पुरेशी तरतूद झालेनंतर त्या दहा दिवसातील एखाद्या दिवशी हा पगाराचा खजिना मिरजहून पुण्याला रवाना व्हायचा. हाच खजिना आपल्या प्रतिसरकारच्या दैनंदिन खर्चासाठी उपयोगी ठरेल, हा प्रयास ठेवून नाना पाटील, जी. डी. बापू व नागनाथ आण्णांनी आपल्या सहकाऱयांसमवेत तो लुटण्याचा बेत आखला. त्यासाठी नाना पाटील यांनी अत्यंत विश्वासू 16 जणांचे पथक तैनात केले. 16 जणांच्या साहसी स्वातंत्र्य सैनिकांच्या पथकाने केलेल्या पूर्वनियोजीत सरावानुसार 7 जून 1943 या दिवशी सकाळी साडेदहा ते पावणेअकरा यावेळेस पगाराची गाडी ताकारी स्टेशनवरुन सुटल्यानंतर गडखिंडीच्या उत्तरेकडील डोंगररांगेत ठिकठिकाणी हे सर्व सहकारी उभे राहून गाडीच्या लोकेशनचे एकमेकांना इशारे करायचे. गाडी खिंडीत आल्यानंतर रेल्वे मार्गावर एका अवघड ठिकाणी व जेथे गाडीचा वेग मंदावतो. तेथे दगडांचा खीळ रचला होता. हा खीळ पाहून चालकाने गाडी थांबवली. गाडी थांबल्याची नेमकी हीच संधी साधत खजिन्याच्या डब्यात नाना पाटील, जी. डी. बापू, नागनाथआण्णा व त्यांच्या सहकाऱयांनी कूच केली. डब्यातील इंग्रज रक्षकास बंदुकीचा धाक दाखवत अवघ्या काही मिनिटात 19 हजार रुपयांचा हा खजिना घेवून हे 16 सहकारी उत्तरेकडील डोंगररांगांमधून पसार झाले.

या साहसी प्रसंगाची कहाणीदेखील स्वातंत्र्यसंग्रामात गाजलेली आहे. अशा ह्या एेतिहासिक रेल्वे लुटीचा अमृतमहोत्सवी क्षण साजरा करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार पुढे होतील, याचीच सर्वांना उत्सुकता लागून आहे. गतवर्षी या घटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला क्षणाचे  स्मरण करण्यासाठी गडखिंडीत जी. डी. लाड यांचे वारसदार अरुण लाड यांच्या पुढाकाराने महात्मा गांधींचे नातू व आंतरराष्ट्रीय र्कितीचे विचारवंत गोपालकृष्ण गांधी, जेष्ठ पत्रकार पी साईनाथ यांना निमंत्रित केले होते. यावेळी क्रांतीसिंह नाना पाटील यांची कन्या हौसाताई पाटील, नातू अॅड. सुभाष पाटील, पुतणे बाबूराव पाटील, नागनाथआण्णांचे वारसदार वैभव नायकवडी आदी उपस्थित होते. 

नैतिकतेवर आधारलेले प्रतिसरकार चालवण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी वाममार्ग पत्करायचा नाही. हा संकल्प नाना पाटील व सहकाऱ्यांचा होता. प्रतिसरकारच्या सक्षस्त्र सैन्यदल व तुफानसेनेसाठी पैशाची गरज होती, म्हणून त्यांनी ही पगाराची गाडी लुटली. हा ऐतिहासिक क्षण खरोखरच प्रेरणादायी आहे.
- अॅड. सुभाष पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com