पादचारी पुलाचे काम चार वर्षे रखडले

शिवाजी यादव
शुक्रवार, 15 जून 2018

कोल्हापूर - विक्रमनगर येथे रुळावर बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचे काम गेली चार वर्षे रखडले असून त्यामुळे हजारो लोकांची सुरक्षा धोक्‍यात आली आहे. केवळ निधी नाही पासून ते क्रेन नाही, अशी कारणे सांगत महापालिकेने ‘ना’चा पाढा सुरू केला आहे. आता रेल्वे प्रशासनाने थेट फौजदारी कारवाईचा इशारा दिल्यानंतर तरी महापालिकेला जाग येणार का? असा प्रश्‍न आहे. 

कोल्हापूर - विक्रमनगर येथे रुळावर बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचे काम गेली चार वर्षे रखडले असून त्यामुळे हजारो लोकांची सुरक्षा धोक्‍यात आली आहे. केवळ निधी नाही पासून ते क्रेन नाही, अशी कारणे सांगत महापालिकेने ‘ना’चा पाढा सुरू केला आहे. आता रेल्वे प्रशासनाने थेट फौजदारी कारवाईचा इशारा दिल्यानंतर तरी महापालिकेला जाग येणार का? असा प्रश्‍न आहे. 

गेल्या पन्नास वर्षांत शहराचा विस्तार झाला असून विक्रमनगर, ख्रिश्‍चनवाडी, टेंबलाईवाडी, दुर्गा कॉलनी अशा भागातील रहिवासी वस्ती वाढली आहे. नागरिकांना रोज मार्केट यार्ड, रूईकर कॉलनी, जाधववाडीकडे येण्यासाठी धोकादायक स्थितीत रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. यात शाळा, भाजीपाला, बस स्थानक आदी सुविधा रुळाच्या अलीकडील भागात असल्याने वर्दळ रुळावरून होते. याच भागात रेल्वे अपघातांत अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर रेल्वे रुळावर पादचारी पूल बांधावा, अशी मागणी झाली. त्यानुसार येथे पादचारी पुलासाठी सिमेंट काँक्रिटच्या पायऱ्या बांधण्यात आल्या. त्याला दोन वर्षे झाली; पण क्रेन नाही म्हणून पुलाचे काँक्रिट बार जोडण्याचे काम राहिले आहे, असे सांगत महापालिका अधिकाऱ्यांनी बेपर्वाईचा कहर केला आहे. शहरात अनेक पूल व इमारत बांधकामासाठी क्रेन मिळतात, मग या पुलांसाठी मिळत नाहीत, हे न पटण्यासारखे आहे.

अशीच तऱ्हा या नियोजित पुलाच्या लगत असलेल्या महापालिका पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनची आहे. या पाईपलाईनला दोन लोखंडी आधार आहेत. त्यांच्या बाजूला दगडी बांधकाम आहे. ते ठिसूळ झाल्याने सर्व भार लोखंडी खांबावर पडला असून खांब व पाईप गंजली आहे. ज्या वेळी रेल्वे येथून जाते तेव्हा जमीन हादरते. पाईपलाईन कोसळते की काय, अशीच भीती निर्माण होते; पण त्याच्या दोन्ही बाजू भक्कम असल्याचा दावा महापालिका अधिकारी करीत आहेत.

यंत्रणा गाफीलच 
रेल्वे प्रशासनाचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी काल बुधवारी महापालिकेवर फौजदारी कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे यंत्रणा हालेल असे वाटत होते. मात्र, केवळ कागदोपत्री फॉलअप देण्यासाठी महापालिकेत हालचाली झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पादचारी पुलाचे काम येत्या महिन्यात सुरू होईल, याची कोणतीच शाश्‍वती तूर्त नाही, असेच यावरून दिसते.

Web Title: railway over bridge work pending