कॅशलेस व्यवहारासाठी रेल्वेचे ‘अडथळे’

शिवाजी यादव
रविवार, 4 डिसेंबर 2016

कोल्हापूर - कोल्हापूर रेल्वेस्थानकावर दिवसाला सरासरी साडेतीन ते चार लाख रुपयांची तिकीट विक्रीतून उलाढाल होते. पण तेथे नोटा तपासणी यंत्र व स्वाईप मशिनच्या अभावामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे. प्रवाशांना सुट्या पैशांअभावी थेट एटीएम, डेबिट कार्ड देऊन तिकीट काढणे कठीण होत आहे. अनेकांना रेल्वे प्रवास रद्द करणे किंवा खासगी वाहनांतून पुढील प्रवास करण्याची वेळ येत आहे. यामुळे प्रवाशांबरोबर रेल्वेलाही आर्थिक फटका बसत आहे. 

दिवसाला किमान दीडशे ते पाचशे प्रवासी येथे आरक्षण नोंदणीसाठी येतात. कोल्हापूर, मिरज, पुणे, मुंबई, सोलापूर या मार्गांवर थेट तिकीट काढण्यासाठी एका गाडीला ५० ते १५० प्रवासी रेल्वे स्थानकावर येतात. तेवढ्या प्रवाशांना तिकीट किंवा आरक्षणाचे पैसे हे केवळ अंदाजाने व नजरेने तपासून घेण्याची वेळ येथील काऊंटर कर्मचाऱ्यांवर आली आहे. नोटा  तपासणीचे यंत्र नसल्याने पाचशे व एक हजाराची नोट आल्यास जागरूकपणे घ्याव्या लागत आहेत. एटीएम बंद असल्याने अनेकांना रोकड मिळत नाही. तातडीच्या प्रवासासाठी अनेकजण एटीएम कार्ड घेऊन रेल्वे स्थानकावर येतात. तेथे आरक्षणासाठी तसेच तिकिटांसाठी रांगा असल्याचे चित्र दिसते. तासभर रांगेत थांबून काऊंटरवर गेल्यानंतर एटीएम कार्ड पुढे केल्यास ‘रोख पैसे द्या. स्वाईप मशिन नाही’, असे उत्तर मिळते. ज्या स्थानकावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते तेथे स्वाईप मशिन नसणे ही बाब मोदींच्या कॅशलेस व्यवहाराच्या घोषणेला ‘खो’ घालणारी आहे. 

असाच प्रकार नोटा तपासणी यंत्राबाबतही आहे. पाच व एक हजारच्या बनावट नोटा रेल्वेस्थानकावर येऊ शकतात. दिवसाकाठी लाखो रुपयांची रोजची उलाढाल असलेल्या कोल्हापूर रेल्वे स्थानकावर नोटा तपासणी यंत्र बसविलेले नाही. गडबडीत पैसे स्वीकारताना नोट बनावट असल्याचे तत्काळ समजून आले नाही तर त्याचा भुर्दंड कॅश भरताना संबंधित कर्मचाऱ्याला बसतो, अशी स्थिती आहे. 

मोबाइल, संगणकांचा वापर करून प्रवासी ऑनलाइन तिकीट बुकिंग करू शकतात हे मान्य आहे. पण अनेक प्रवाशांना ऐनवेळी प्रवासासाठी निघावे लागते. यात ज्येष्ठ व्यक्ती, महिला, अल्पशिक्षित आहेत. अशांना ऑनलाइन बुकिंगची प्रक्रिया करता येणे कठीण होते. पण बॅंकेचे एटीएम कार्ड त्यांच्याकडे असूनही त्याचा वापर तिकीट काढण्यासाठी होत नाही. शंभर, दीडशे रुपये किंवा तीनशे रुपयांचे तिकीट काढायचे झाल्यास एटीएम स्वाईपचा पर्याय रेल्वेस्थानकावर असायला हवा.
- शिवनाथ बियाणी, रेल्वे प्रवासी संघटना

Web Title: railway problem in cashless transaction