दाट धुक्‍याचा रेल्वेला "ब्रेक'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

केत्तूर, (जि. सोलापूर) - उजनी पाणलोट परिसरातील पारेवाडी, जिंती व वाशिंबे (ता. करमाळा) रेल्वे स्टेशन परिसरात आज (ता. 10) पडलेल्या दाट धुक्‍यामुळे पाच फूट अंतरावरील काहीही दिसत नव्हते. याचा परिणाम रेल्वे गाड्यांवर झाला. या रेल्वे स्टेशन परिसरात या गाड्यांना ब्रेक घ्यावा लागला.

धुके एवढे दाट होते की मोटरमनना पुढचे काहीही दिसत नसल्यामुळे पारेवाडी रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या सुपरफास्ट एक्‍स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या वेगावर परिणाम झाला. सोलापूर-मुंबई सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस, हैदराबाद-मुंबई एक्‍स्प्रेस, मुंबई-सोलापूर मेल या गाड्या अतिशय कमी वेगाने मार्गस्थ झाल्या. इतरही रेल्वे गाड्या उशिराने धावत होत्या.

दाट धुक्‍यामुळे मोटरमनना पुढचे काहीच दिसत नसल्याने रेल्वे प्रशासनाने रेल्वे सिग्नलपासून अलीकडे 270 मीटर अंतरावर रुळावर विशिष्ट प्रकारचे फटाके ठेवले होते. गाडी या फटाक्‍यावरून जाताच त्याचा आवाज झाल्याने पुढे सिग्नल किंवा स्टेशन असल्याचे समजते. असे फटाके पारेवाडी रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रशासनाकडून प्रथमच फोडण्यात आले.

पिकांवर रोगराईची भीती
या धुक्‍यामुळे भाजीपाला व इतर पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगराई पडण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे आता या संकटाची भर पडली आहे. तर उजनी जलाशय परिसरातील या धुक्‍यामुळे मासेमारीसाठी जाळे सोडणे अवघड झाल्याने मच्छिमारांनाही माघारी फिरावे लागले.

Web Title: Railway Stop by Fog