रेल्वे बंद, एसटी नाही... शाळेला कस जायचं? 

प्रमोद जेरे
Tuesday, 16 February 2021

पॅसेंजर रेल्वेची सुविधा पूर्ण बंद, एसटी जादा गाड्या सोडायला तयार नाही आणि त्यात भर म्हणजे वडापवरची बंदी... यांसह अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी सध्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

मिरज (जी. सांगली)  : पॅसेंजर रेल्वेची सुविधा पूर्ण बंद, एसटी जादा गाड्या सोडायला तयार नाही आणि त्यात भर म्हणजे वडापवरची बंदी... यांसह अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी सध्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शाळा, महाविद्यालये सुरू होऊनही केवळ प्रवासाची सुविधा नसल्याने हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळा-महाविद्यालयांमध्ये वेळेवर जाता येत नाही. हे वास्तव सर्वांना माहीत असूनही क्षुल्लक विषयांसाठी अकांडतांडव करणाऱ्या विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष यांसह सामाजिक संघटनांनीही याबाबत सोयीस्कर मौन पाळले आहे. 

मिरज शहरात तीन कला आणि वाणिज्य महाविद्यालय, एक अभियांत्रिकी महाविद्यालय, एक वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, सात हायस्कूल यांसह अनेक प्राथमिक शाळा आहेत. यांपैकी हायस्कूल आणि शाळा यापूर्वी सुरू झाल्या आहेत; परंतु महाविद्यालये मात्र आजपासून (ता. 15) सुरू झाली आहेत. या सर्व शाळा, महाविद्यालयांतून शिकणारे किमान तीन ते चार हजार विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. त्यामुळे यापैकी पन्नास टक्केही विद्यार्थ्यांची सोय सध्या होत नसल्याची पालक, विद्यार्थी आणि शैक्षणिक संघटनांची तक्रार आहे.

मिरज शहरात रेल्वेने येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी आहे; परंतु रेल्वेची सुविधा संपूर्ण बंद असल्याने या सर्व विद्यार्थ्यांना आता एसटीने येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. साहजिकच त्या प्रमाणात एसटी सेवा उपलब्ध नसल्याने हजारो विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येऊ शकत नाहीत. हीच व्यथा शाळा आणि हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आणण्यासाठी आता शाळांचे व्यवस्थापनच वाहनांच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहेत. काही शाळा, महाविद्यालयांनी खासगी बसेस भाड्याने घेऊन तशी सेवाही सुरू केली आहे. 

मागणीनुसार गाडी सोडण्याचे धोरण
शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने मुक्काम गाड्यांची संख्या वाढवली आहे. विद्यार्थी आणि प्रवाशांच्या मागणीनुसार गाडी सोडण्याचे महामंडळाचे धोरण आहे. 
- शिवाजीराव खांडेकर, आगार व्यवस्थापक, मिरज 

गांभीर्याने दखल घ्यावी.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये यावेच लागेल. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी. 
- शैलेशदादा देशपांडे, अध्यक्ष, मिरज विद्या समिती 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railways closed, no ST ... How to go to school? issue in Sangali