पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रेल्वे सरसावली 

तात्या लांडगे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पुरामुळे राष्ट्रीय व राज्य मार्ग बंद असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुरग्रस्तांना वेळेत मदत व्हावी या उद्देशाने मदतीच्या वस्तू रेल्वेतून मोफत पाठविण्याची सोय रेल्वेने उपलब्ध करुन दिली आहे. 

सोलापूर - मुंबईसह पुणे, कोकण, सांगली, कोल्हापूर, सांगली, सातारा, धुळे, नंदूरबार यासह अन्य ठिकाणच्या पुरग्रस्तांसाठी विविध सामाजिक संस्था, राजकीय, सामाजिक नेतेमंडळींकडून मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र, पुरामुळे राष्ट्रीय व राज्य मार्ग बंद असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुरग्रस्तांना वेळेत मदत व्हावी या उद्देशाने मदतीच्या वस्तू रेल्वेतून मोफत पाठविण्याची सोय रेल्वेने उपलब्ध करुन दिली आहे. 

मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे, धुळे, नंदूरबार मध्ये दमदार पाऊस झाल्याने अनेकांचा सुखाचा संसार उघड्यावर आला. अनेकांची जनावरे, भांडी, घरातील जिवनावश्‍यक वस्तू पुरात वाहून गेल्या. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरसह राज्यभरातील विविध सामाजिक संस्थांसह राजकीय व सामाजिक व्यक्‍तींकडून जिवनावश्‍यक वस्तूंची मदत केली जात आहे. मात्र, तिथपर्यंत पोहचण्यासाठी अद्याप रस्ते वाहतूक सुरळीत झालेली नाही. त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने त्या वस्तू विनाशुल्क पुरग्रस्तांपर्यंत पोहच करण्याची व्यवस्था केली आहे. दरम्यान, बहूतेक ठिकाणी रेल्वे पोहचू शकत नसतानाही राज्य परिवहन मंडळाने मात्र, नुसती बघ्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मात्र, बोलायला स्पष्ट नकार दिला. 

महाराष्ट्रासह अन्य राज्यातील पूरग्रस्तांसाठी केलेली मदत रेल्वेच्या माध्यमातून विनाशुल्क पोहच केली जाणार आहे. तत्पूर्वी, संबंधित संस्था अथवा व्यक्‍तींनी रेल्वेच्या पार्सल विभागात त्याची नोंद करणे आवश्‍यक आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे पत्र राज्यातील सर्व रेल्वे विभागांना प्राप्त झाले आहे. 
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railways help flood victims