सोलापुरात भीजपाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील अक्‍कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील फुलोऱ्यात आलेल्या उडीद, मूग, सोयाबीन या पिकांनी पाण्याअभावी माना टाकायला सुरवात केली होती. परंतु, काल (बुधवार) दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने आजही (गुरुवारी) दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर होत असलेल्या भीजपावसाने खरीप पिकांना दिलासा दिला. पावसामुळे दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही.

सोलापुरातील 200 किलोमीटर परिसरात मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येत आहे. परंतु, सध्या होत असलेला पाऊस कृत्रिम की नैसर्गिक, हे आताच सांगणे कठीण असल्याचे वैज्ञानिक डॉ. शिवसाई दीक्षित यांनी "सकाळ'ला सांगितले. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मात्र प्रयोग केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण सोलापूर, करमाळा, माढा आणि मंगळवेढा तालुक्‍यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्या ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने माहिती गोळा करण्यास सुरवातही केली आहे. परंतु, मागील महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला असून, वाया चाललेल्या पिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Rain