कोल्हापूर जिल्ह्यात ‘तरण्या’ची दमदार हजेरी

कोल्हापूर जिल्ह्यात ‘तरण्या’ची दमदार हजेरी

कोल्हापूर - पावसाळ्याच्या ऐन मध्यावर आकसलेल्या पावसाने आज दमदार मुसंडी मारली. पाणलोट क्षेत्रात दमदार, तर शहरात दिवसभर रिपरिप सुरू होती. पंचगंगेची पातळी २७ फूट झाली. २७ बंधारे पाण्याखाली असून, धरणाच्या साठ्यातही लक्षणीय वाढ झाली. जिल्ह्यात सरासरी ३७.८१ मिलिमीटर पाऊस झाला. १४ जुलैपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

शहरात मंगळवारी मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरवात झाली. पहाटे पावसाचा जोर वाढला. दुपारी ११ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. दुपारी पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी पावसाला सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. जोरदार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ झाली असून, २७ फूट पातळीची नोंद केली. पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीसदृश पाऊस पडला.

पावसाची सरासरी (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये, कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे) 
हातकणंगले- ३.६३ (१४१.६९), शिरोळ- ३.४२ (९३.०६), पन्हाळा- २२.४३ (२८१.०४), शाहूवाडी- ६०.०० (७२४.६३), राधानगरी - ५१.१७ (७०८.०२), गगनबावडा - ९१.०० (१४४४.५०), करवीर - १४.२७ (२१८.४५), कागल- २४.८५ (३५६.०८), गडहिंग्लज- १८.७१ (२३७.५५), भुदरगड - ५३.०० (५८९.००), आजरा- ३७.७५ (५३४.५०), चंदगड - ७३.५० (९०५.७१) एकूण - ४५३.७३ (६२३४.२१) सरासरी ३७.८१ (५१९.५२)

तुळशी परिसरात उच्चांकी पाऊस
तुळशी धरण परिसरात २४ तासांत ८८ मिमी असा यंदाचा उच्चांकी पाऊस नोंदला. काल येथे ९८ मिमी पाऊस झाला होता. आजही या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.

चंदगडला तीन घरांची पडझड
चंदगड - आज तिसऱ्या दिवशीही तालुक्‍यात पावसाची संततधार सुरू होती. सलग लागलेल्या पावसाने ताम्रपर्णी पूल तसेच ताम्रपर्णी नदीवरील कोकरे, कोनेवाडी, हल्लारवाडी बंधारे पाण्याखाली गेले. घटप्रभा नदीवरील हिंडगाव पूल तसेच भोगोली व गवसे हे बंधारेही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. नदीकाठावरील पिके चार-पाच फूट पाण्याखाली होती. तुर्केवाडी, मजरे शिरगाव व चंदगड येथे घरांच्या भिंतीची पडझड होऊन सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. 

गगनबावड्यात धुक्‍याची दुलई
गगनबावडा - तालुक्‍यात आज दिवसभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात येथे ९१ मि.मी. पावसाची नोंद झाली. चालू हंगामात आज सकाळपर्यंत १४४४ मि. मी. पाऊस झाला. दरम्यान कोदे धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असून तेथे आज सकाळपर्यंत २४ तासांत १४७ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आज दिवसभर पाऊस व धुक्‍याचेच साम्राज्य होते. पावसाच्या जोडीने आलेल्या बोचऱ्या वाऱ्यामुळे कमालीचा गारठा वाढला आहे.

गडहिंग्लज तालुक्‍यात संततधार
गडहिंग्लज : शहरासह तालुक्‍यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस कोसळत आहे. खरीप हंगामातील पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. जून महिन्यातील तुरळक पावसाने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी संततधार पावसामुळे समाधान व्यक्त केले आहे. सोयाबीन, भात, भुईमूग आदी पिकांना पावसाची गरज होती. माळरानावरील भाताला तर या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. या भागासह आजरा व आंबोली परिसरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास उद्यापर्यंत हिरण्यकेशी पात्राबाहेर जाण्याची शक्‍यता आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गडहिंग्लज तालुक्‍यात सरासरी १८.७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गडहिंग्लज मंडलमध्ये २१, कडगावला १८, दुंडगे व हलकर्णी भागात प्रत्येकी ७, नूलला ४, महागावला २२ व नेसरी मंडलमध्ये ५२ मि.मी. पाऊस झाला.

ओलवन धरण भरले
राधानगरी : दाजीपूर परिसरात असलेले ओलवनचा छोटा धरण तलाव आज पूर्णक्षमतेने भरला. राधानगरी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात ओलवन व हसणे ही दोन लहान धरणे आहेत. पैकी ओलवनचे ०.६५ टीएमसी क्षमतेचे हे धरण आज भरून वाहू लागले आहे. तरण्याची दमदार हजेरी

कोनवडे - ऊन-पावसाच्या खेळामुळे चिंतेत असणाऱ्या बळीराजाला तरण्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने ऊस, भुईमूग, सोयाबीन पिके वाचली आणि तरारून आल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर आले.

कासारी पात्राबाहेर
पोर्ले तर्फ ठाणे - आसुर्ले पोर्ले परिसरात कालपासून दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे परिसरातील कासारी नदीला पूर आला आहे. यंदा खरिपाच्या पेरण्या साधल्या आहेत. गारगोटी आठवडी बाजारात त्रेधा कोनवडे - वेदगंगेच्या पातळीतही झपाट्याने वाढ झाल्याने म्हसवे, निळपण बंधारा पाण्याखाली गेला. परिणामी हेडवडे, गिरगाव, मिणचे, कोळवण, मोरस्करवाडी, बसरेवाडी, दारवाड, निळपण परिसरसह 
अनेक गावातील वाहतूक महालवाडी मार्गे गारगोटी वळवावी लागली. गारगोटी आठवडी बाजारकरूंची तारांबळ उडाली.

राधानगरी धरण महिनाभर आधी भरणार
राधानगरी - आज राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी धरण क्षेत्रासह पाणलोट क्षेत्रात सलग पाचव्या दिवशीही अतिवृष्टी झाल्याने सर्व धरणांच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पाचच दिवसांच्या पावसाने गतवर्षीची सरासरी ओलांडली आहे. राधानगरीच्या पाणलोट क्षेत्रात आजही अतिवृष्टी सुरू असल्याने वीज निर्मितीसाठी सोळाशे क्‍युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण महिनाभर आधीच भरण्याची शक्‍यता आहे. तुळशी धरण परिसरात ८८ मिमी पाऊस झाला. 

राधानगरी धरण ३४७.५० फूट पातळी झाली की भरते. आठवडाभरातच ही पातळी गाठण्याची शक्‍यता आहे. धरणक्षेत्रात २४ तासात ८० मिमी पाऊस झाला असून ४.८९ टीएमसी साठा झाला आहे. ५८ टक्के साठा आहे. काळम्मावाडीमध्ये १३.३४ टीएमसी साठा झाला असून येथे ६७ मिमी पाऊस झाला आहे. ५३ टक्के संचय झाला आहे. तुळशी धरण ६२ टक्के भरले आहे. यामध्ये २.१६ टीएमसी साठा झाला असून येथे ८८ मिमी पाऊस झाला आहे. राधानगरी धरण गेल्यावर्षी २६ ऑगस्टला  भरले होते. असाच पाऊस सुरू राहिल्यात आठवडाभरात भरण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com