सांगलीत समाधानकारक पाऊस झाल्याने निसर्गाला बहर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम टोक, घनदाट वनराईचा चांदोली परिसर संततधार पावसाने चिंब झाला आहे. या परिसरातील सकाळचे वाचक चित्रकार अशोक जाधव यांनी वारणामाईचा रुद्रावतार आणि निसर्ग सौंदयाची लयलुट चित्रबध्द केली आहे.

सांगली- सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम टोक, घनदाट वनराईचा चांदोली परिसर संततधार पावसाने चिंब झाला आहे. या परिसरातील सकाळचे वाचक चित्रकार अशोक जाधव यांनी वारणामाईचा रुद्रावतार आणि निसर्ग सौंदयाची लयलुट चित्रबध्द केली आहे.

वरूणराजा संततधार बरसत असून, डोंगरदऱ्यातून वाहणारे ओढे, नाले लहान-मोठ्या काळया भिन्न दगडांचे अडथळे पार करत त्यांच्या अंगाखांद्यावरुन मनमोहकपणे कोसळत, फेसाळत, खळाळत संत वाहणाऱ्या वारणामाईच्या जणू दर्शनाला येत आहेत. जसे पंढरीच्या पांडूरंगाच्या भेटीला, दर्शनाला वारकरी अनेक ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने मनोभावे श्रध्देने, भक्तीभावाने पायी चालत, हरीनामाचा गजर करत, त्यात मंत्रमुग्ध होऊन, टाळ मृदंगाच्या तालावरती तल्लीन होऊन नाचत निघालेले आहेत.

सतत वरून बरसणारा वरुणराजा, वारणा धरणाचा विसर्ग, आणि डोंगरदऱ्यातून खळाळत येणारे पाणी, यांना आपल्या पोटात सामावून घेणारी वारणामाई आता रूद्रअवतार धारण करून, तुडूंब भरुन वाहत आहे. तिचे हे रुद्र रुप उरात धडकी भरवणारे आहे. नेहमी बळीराजावरती प्रसन्न असणारी वारणामाई, आता मात्र संततधार बरसणाऱ्या पावसामुळे महाकाय बनली आहे. तिच्या काठावरती असणाऱ्या पिकांना आणि गुरांच्या ओल्या चाऱ्याला तीने विळखा घातला आहे. वारणामाईच्या दोन्ही बाजूंनी हिरवाईची चादर पांघरलेले मखमाली डोंगर आहेत. डोंगराच्या कुशीत वसलेली टुमदार घरांची छानशी गावे आहेत. गर्द हिरवीगार भात व ऊस शेती आहे. रानातील पक्षांच्या गोड स्वरांचा किलबिलाट कानावर पडत आहे. आभाळातून ओथंबून आलेले नभ दिसत आहेत.

Web Title: rain in sangli district