महापुराचा विळखा सैल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

शहरासह जिल्ह्याला पडलेला पुराचा विळखा हळूहळू सैल होत असला तरी करवीर तालुक्‍यातील चिखली व आंबेवाडी, शिरोळ तालुक्‍यातील बहुतांश गावांतील पूरस्थिती अजूनही ‘जैसे थे’ आहे. धरणांतील पाण्याचा विसर्ग आज कमी झाला असला, तरी पंचगंगेसह जिल्ह्यातील नद्यांची पातळी फारशी कमी झालेली नाही. आज सायंकाळी संपलेल्या २४ तासांत पंचगंगेच्या पातळीत केवळ दीड फुटाची घट झाली.

कोल्हापूर - शहरासह जिल्ह्याला पडलेला पुराचा विळखा हळूहळू सैल होत असला तरी करवीर तालुक्‍यातील चिखली व आंबेवाडी, शिरोळ तालुक्‍यातील बहुतांश गावांतील पूरस्थिती अजूनही ‘जैसे थे’ आहे. धरणांतील पाण्याचा विसर्ग आज कमी झाला असला, तरी पंचगंगेसह जिल्ह्यातील नद्यांची पातळी फारशी कमी झालेली नाही. आज सायंकाळी संपलेल्या २४ तासांत पंचगंगेच्या पातळीत केवळ दीड फुटाची घट झाली. पंचगंगा आज अजूनही धोक्‍याच्या पातळीवर असून, त्याची पातळी ४७ फुटांवर आहे.

कालपर्यंत राधानगरीसह इतर धरणांतून सुरू असलेला विसर्ग आज कमी झाला. राधानगरीतून केवळ वीजनिर्मितीचाच १४०० क्‍युसेक, तर कोयना धरणातून ३६ हजार ३१० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा, काळम्मावाडी, पाटगाव, कुंभी धरणातील विसर्गही कमी करण्यात आला.

अलमट्टी धरणातून पाच लाख ४० हजार क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. अलमट्टीचा विसर्ग वाढवून शहर व जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत म्हणावी तशी घट झालेली नाही, त्यामुळे शिरोळ तालुक्‍यातील पूरस्थिती कायम आहे.

शिरोळमध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या लोकांना आजही हेलिकॉप्टरद्वारे खाद्यपदार्थांसह जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी १८.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक ५५, तर शिरोळ तालुक्‍यात सर्वांत कमी ३.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २११९.३४ मिलिमीटर पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणासह जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. 

पुणे-बंगळूर महामार्ग खुला
आठ दिवसांपासून पुराच्या पाण्याखाली असलेला पुणे-बंगळूर महामार्ग आज सुरू करण्यात आला. सकाळी एकेरी, तर सायंकाळपासून दुतर्फा वाहतूक सुरू झाली. सकाळच्या सत्रात या मार्गावरून पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरसह इतर जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने शहरात आणण्यात आली. कोल्हापूरहून पुणे, पणजी, इचलकरंजी, कोडोली आदी मार्गांवरील वाहतूकही आज सुरू झाली. जिल्ह्यातील ८४ बंधारे अजूनही पाण्याखाली असून, यावरील वाहतूक काही ठिकाणी पूर्णपणे बंद, तर काही ठिकाणी पर्यायी मार्गाने सुरू आहे.

कृष्णाकाठी स्वच्छतेला गती
सांगली - कृष्णेचा पूर संथ गतीने उतरत आहे. कृष्णाकाठावरील गावे सावरू लागली आहेत. येथील आयर्विन पुलावर दुपारी चारच्या दरम्यान ५०.५ फूट पाणीपातळी होती. शहरासह जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांतील घरांतून पाणी हटेल, तसतशी आपापली घरे आणि दुकानांमधून स्वच्छतेच्या कामाला गती येत आहे. राज्यभरातून मदतीचा ओघ कायम आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्थांकडून वाटप सुरूच आहे. 

कृष्णा नदीचे पाणी पात्रात जाण्यासाठी आणखी दोन दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. कोयना, चांदोली धरणांतून विसर्गही कमी करण्यात आला. परजिल्ह्यांतून येणारी मदत जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका प्रशासनाकडे उतरवून ती वाटण्याचे नियोजन सुरू आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मिरजेतील पाणीपुरवठा सुरळीत झाला असून, सांगलीतील पाणीपुरवठा दोन दिवसांनी सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’कडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात आठवडाभर विस्कळित झालेला गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत आहे. बॅंकांची एटीएम सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. आज सुटी असतानाही अनेक बॅंका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. 

घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पूरबाधित, तसेच प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. घरातील गाळ, घुशी, उंदरे मरून पडलेली आहेत. गुंठेवारी भागातील अनेक घरांत साप सापडत आहेत. सांगली जिल्ह्यातील वारणा-कृष्णा नद्यांच्या काठांवरील ११७ गावांना पुराचा फटका बसला आहे. जिल्ह्यातून किमान पावणेदोन लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून, ५० हजार जनावरांनाही वाचविण्यात आले आहे. शिराळा, पलूस तालुक्‍यांतील पूर ओसरत असून, सर्वच ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Water Flood Sangli Kolhapur Water Decrease