आजरा तालुक्यात संततधार; साळगाव बंधारा पाण्याखाली

रणजित कालेकर
रविवार, 7 जुलै 2019

आजरा - तालुक्‍यात काल रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे अनेक भागात पुरस्थिती आहे. साळगाव बंधारा पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतुक सोहाळे मार्गे वळवण्यात आली आहे.

आजरा - तालुक्‍यात काल रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे अनेक भागात पुरस्थिती आहे. साळगाव बंधारा पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतुक सोहाळे मार्गे वळवण्यात आली आहे.

शेतवडीत पाणी घुसले आहे. पेरणोलीत ओढा शेतात घुसल्याने भात लावण केलेली शेती वाहून गेली आहे. सुमारे पाच एकर क्षेत्राला पाण्याचा फटका बसला आहे. तालुक्‍यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अनेक ठिकाणी पाणी रस्त्यातून वाहत आहे. शेतवडीतही मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. ओढे, नाले तुंडबून भरून वाहत आहेत तर चित्रा, हिरण्यकेशी नदी धोक्‍याची पातळी ओलांडून वाहत आहेत. आंबोली व तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सातत्याने संततधार सुरु असल्याने हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावर दोन फुट पाणी आले आहे.

पेरणोली येथे पठार व बांबरातून येणारे ओहळाचे पाणी गाव तळ्याजवळील शेतात घुसल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. सुमारे पाच एकरातील भात रोप लावण वाहून गेली आहे. यामध्ये सचिन देसाई, प्रल्हाद देसाई, यशवंत कोडक, विठ्ठल मुळीक, लक्ष्मण मुळीक, सुला सासुलकर यांचे नुकसान झाले आहे. नामदेव येरूडकर, पांडू चव्हाण यांच्या घरात पाणी घुसले आहे.

नैसर्गिक पात्र बदलण्यामुळे नुकसान 
पेरणोली वझरे रस्ता तयार करतांना ठेकेदारांने नैसर्गिक पात्र बदलून पश्‍चिमेकडे पाणी वळवले. येथे मोरी ठेवली नाही. पावसाळ्यातील पाणी माले शेत ओढ्याला जात होते. ते मसोबा ओढ्याकडे आले आहे. दोन्ही ओढ्याचे पाणी पात्रात न मावल्याने शेतीचे नुकासान झाल्याचा आरोप ज्ञानदेव देसाई यासह शेतकऱ्यांनी केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rains in Ajra Taluka, water on Salgaon bridge