कृष्णा काठ ओला; जत, आटपाडी मात्र कोरडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

आटपाडी - कोकण आणि कृष्णाकाठाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे, मात्र आटपाडी तालुक्‍यात अपेक्षित पाऊस कोसळलेला नाही. आजही अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू असून, बहुतांश सर्वच गावचे ओढे-नाले कोरडे ठणठणीत आहेत.

आटपाडी - कोकण आणि कृष्णाकाठाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे, मात्र आटपाडी तालुक्‍यात अपेक्षित पाऊस कोसळलेला नाही. आजही अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू असून, बहुतांश सर्वच गावचे ओढे-नाले कोरडे ठणठणीत आहेत.

सांगली जिल्ह्यातील पश्‍चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मात्र आटपाडी तालुक्‍यात वरुणराजाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही. महिनाभर तालुक्‍यात विविध ठिकाणी पाऊस पडतो आहे, पण तो दमदार नाही. दिवसभर संपूर्ण ढगाळ वातावरण असते, सूर्यदर्शनही होत नाही. एखादी सर कोसळते.

आटपाडी मंडलमध्ये दीडशे मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मात्र शेटफळे, करगणी, झरे, निंबवडे, कौठळी या भागात पाऊसच पडलेला नाही. तालुक्‍यात बहुतांश सर्व ओढे-नाले अद्याप कोरडे ठणठणीत आहेत. काही अपवादात्मक बंधारे सोडले, तर बहुतांश सर्वच ओढ्यांवरील बंधारे कोरडे आहेत. रिमझिम पाऊस पडत असला, तरी अद्याप शेतातून पाणी नाही, तलाव, विहिरीही कोरड्या आहेत. त्यामुळे पुराच्या वाहून जाणाऱ्या  पाण्याने टेंभू योजनेतून दुष्काळी भागातील तलाव आणि ओढ्यावरील बंधारे भरून द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

जत तालुका कोरडा ठणठणीत

एकीकडे कुष्णाकाठी महापूराचे संकट घोंगावत असताना जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी जत तालुक्‍यातील तलाव मात्र आजही कोरडे ठणठणीत आहेत. अर्थात जत तालुक्‍यासाठी हा दुष्काळ नवा नाही. मात्र ते चित्र राजकीय इच्छाशक्तीने बदलण्याची संधी मात्र शासनाकडे आहे. निवडणुकीच्या तोंडावर तालुक्‍यातील जनतेच्या तोंडाला अश्‍वासनांची पाने पुसली जातात. आता तरी या पाण्यासाठी ठोस व्हावेत यासाठी तालुक्‍यातील जनतेचे डोळे शासनाकडे लागलेत.

जत तालुक्‍यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या योजनेच्या कार्यक्षेत्राबाहेरील सुमारे ४० गावांना पाणी देण्यासाठी कोणतीही योजना आजही अस्तित्वात नाही. त्यामुळे या गावांना कर्नाटक शासनाच्या सिंचन योजनांमधून पाणी देण्याची योजना येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीने मांडली. प्रारंभी कर्नाटक शासनाच्या हिरे पडसलगी योजनेतून पाण्याचा अहवाल सिंचन सहयोग संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला.

त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकच्या तुबची बबलेश्‍वर योजनेतून पाणी घेतले जाईल, अशी घोषणा जतच्या दुष्काळी दौऱ्यात केली. मात्र त्यानंतर आजतागायत याबाबत फक्त घोषणाच सुरु आहे. लोकसभा निवडणुकीआधी खासदार संजय पाटील यांनी कर्नाटक नव्हे तर म्हैसाळ योजनेतूनच पाणी दिले जाईल, अशी घोषणा करीत म्हैसाळ योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. 

जत तालुक्‍यातील मोठ्या भागासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी अजूनही स्वप्नवत आहे. अशा स्थितीत कर्नाटककडून पाणी देणे आणि पाणी घेणे हा दोन राज्यादरम्यानचा करार करणे अधिक सहजशक्‍य आहे. हा मुद्दा सातत्याने पुढे रेटला. सध्या महाराष्ट्रातून कर्नाटकाकडे मोठ्या प्रमाणात कृष्णेतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. केवळ कर्नाटकच्या तिकोटा जवळील कॅनॉल मधून नैसर्गिक तलावाने सोमदेवरहट्टी येथील तलावा मार्गे तिकोंडी, भिवर्गी हे तलाव त्वरित भरून घेता येतात. आता यावर खासदार व आमदारांनी पुढाकार घेऊन या भागातील सर्व तलाव करून घ्यावे. सध्या या भागात पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही टॅंकर सुरू आहेत ते ही बंद होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rains on Krishna valley but Jat, Atpadi dry