सहकार चळवळीतून जीवनमान उंचावावे - विद्यासागर राव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

सोलापूर - ‘शंभर वर्षांचा इतिहास असणारी भारतातील सहकार चळवळ जगातील सर्वात मोठी चळवळ आहे, ही चळवळ अधिक प्रभावी आणि उपयोगी होण्यासाठी सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळण्याची गरज आहे. ज्याद्वारे लोकांची आर्थिक उन्नती आणि जीवनमान उंचावण्यासाठी काम व्हायला हवे,’’ अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. 

सोलापूर - ‘शंभर वर्षांचा इतिहास असणारी भारतातील सहकार चळवळ जगातील सर्वात मोठी चळवळ आहे, ही चळवळ अधिक प्रभावी आणि उपयोगी होण्यासाठी सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळण्याची गरज आहे. ज्याद्वारे लोकांची आर्थिक उन्नती आणि जीवनमान उंचावण्यासाठी काम व्हायला हवे,’’ अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. 

राज्य शासनाच्या सहकार पुरस्काराचे वितरण राज्यपालांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, सहकार आयुक्त संभाजी कडू पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, आमदार प्रशांत परिचारक आदी या वेळी उपस्थित होते. 
राज्यपाल म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात जवळपास साडेचार लाख लोकांना या माध्यमातून रोजगार मिळतो आहे. पूर्वी कृषी पतपुरवठ्यापर्यंत मर्यादित असलेल्या संस्था आज विस्तारल्या आहेत. बॅंका, पतसंस्था, दुग्ध, अन्नप्रक्रिया, गृहनिर्माण यासारख्या विविध क्षेत्रांत सहकार रुजतो आहे.

खऱ्या अर्थाने सामाजिक, आर्थिक उन्नतीमध्ये या चळवळीचे योगदान मोठे राहिले आहे. साखर कारखानदारीतील योगदानही दखल घेण्यासारखे आहे.’’
बागडे म्हणाले, ‘‘पुरस्काराने प्रेरणा मिळावी, हाच हेतू असतो. २०१४ मध्ये २ लाख ३० हजार संस्था होत्या, आज ही संख्या १ लाख ९६ हजारांवर आली आहे. सगळ्याच संस्था वाईट आहेत, असे नाही.’’ 

...म्हणून सावकारी वाढते आहे
महाराष्ट्रातील ८०-९० टक्के ग्रामीण भाग सहकाराशी जोडला गेलेला आहे. विकास सोसायट्या या गावच्या महत्त्वाच्या आर्थिक स्रोत राहिल्या आहेत. पण अलीकडे विविध कारणाने या सोसायट्या कर्ज देण्यात कमी पडल्या, महाराष्ट्रातील विभागनिहाय कर्जपुरवठ्याचा विचार केल्यास कोकणात केवळ १ टक्का, नाशिक विभागात ८ टक्के, पुणे विभागात १० टक्के, अमरावतीत ५ टक्के आणि नागपूर विभागात केवळ अडीच टक्के इतके कर्जवाटपाचे प्रमाण आहे. या संस्था पुरेशा प्रमाणात कर्जपुरवठा करू शकत नाहीत, त्यामुळेच सावकारी वाढते आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष बागडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Web Title: Raise life from the co-operation movement