रायवळसाठी यंदा जास्त पैसे मोजावे लागणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

सातारा - या वर्षी रायवळ आंब्यांच्या झाडांना मोहर मोठ्या प्रमाणात येवूनही फळे पुरेशा प्रमाणात लागलीच नाहीत. यामुळे रायवळ आंब्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या कलमी आंब्यांना चांगला बहर आहे. मात्र, रायवळसाठीही नागरिकांना यंदा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

सातारा - या वर्षी रायवळ आंब्यांच्या झाडांना मोहर मोठ्या प्रमाणात येवूनही फळे पुरेशा प्रमाणात लागलीच नाहीत. यामुळे रायवळ आंब्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या कलमी आंब्यांना चांगला बहर आहे. मात्र, रायवळसाठीही नागरिकांना यंदा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

जिल्ह्यात दुष्काळी खटाव, माण, फलटण तालुक्‍यांतही आंब्याची झाडे आहेत. मात्र, जास्त प्रमाणात पश्‍चिम भागात पाटण, जावळी, सातारा, वाई आणि महाबळेश्‍वर तालुक्‍यांत रायवळ आंब्यांच्या झाडांचे प्रमाण जास्त आहे. यावर्षी मोहर चांगला आला. आंब्यांपासून मिळणारे पैसे लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी झाडांवर औषधांची फवारणी केली. त्यामुळे मोहर वाचविण्यात शेतकरी यशस्वी झाले. पण, यावर्षी झाडांना फळे पुरेशा प्रमाणात लागली नाहीत. 

आंब्याचे उत्पादन योग्य प्रमाणात असल्यास सुमारे ५०० ते ७०० ट्रक आंबा पुण्या-मुंबईच्या बाजारपेठेत पाठविला जातो. या वर्षी या प्रमाणात घट होणार आहे. हापूस आंबा त्याच्या दरामुळे सामान्यांना परवडत नाही. त्यामुळे रायवळ आंब्याची नागरिक वाट पाहात असतात. हा आंबा २५ ते साधारण ८० रुपये डझनाने विकला जातो. मात्र, या वर्षी त्यालाही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. १९९० पासून जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून एक हजार ४०० हेक्‍टर क्षेत्रावर आंब्यांच्या बागा झाल्या असून, शेतकऱ्यांनी हापूस, रत्ना, केशर अशा जातींच्या रोपांची लागवड केली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने फळबाग योजना राबविण्यात आली. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आंब्यांच्या बागा करण्यास प्राधान्य दिले. प्राधान्याने रत्ना, हापूस या जातींची झाडे लावली आहेत. या शेतकऱ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे कलमी आंब्यांच्या बागा मात्र चांगल्या बहरल्या आहेत. काही बागांत झाडांना दोन वेळा मोहर आला. प्रथम आलेल्या मोहराच्या कैऱ्या मोठ्या झाल्या आहेत. ती फळे लवकर बाजारात येणार आहेत. आता आलेल्या मोहराची फळे साधारण जून, जुलैमध्ये हाताशी येतील, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

Web Title: raiwal mango