होणार सून मी म्हणत...राज ठाकरे यांची फेसबूकवरुन बदनामी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

सोलापुरातील सागर गुब्याडकर याने राज ठाकरे यांच्या चेहऱ्याला महिलेचे रुप देऊन होणार सून मी गांधी घराण्याची अशी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याची फिर्याद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर लोकसभेचे अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी जोडभावी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार संबंधित तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यात काही दिवसांपूर्वी भेट झाली. त्यानंतर सोलापुरातील सागर गुब्याडकर याने राज ठाकरे यांच्या चेहऱ्याला महिलेचे रुप देऊन होणार सून मी गांधी घराण्याची अशी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याची फिर्याद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर लोकसभेचे अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी जोडभावी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार संबंधित तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाचा एकही उमेदवार उभा न करता राज्यभर प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी सोनिया गांधी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर सोशल मिडियावर राजकीय चर्चांना उधाण आले होते.

दरम्यान, सोलापुरातील शाहीर वस्ती येथे राहणाऱ्या सागर गुब्याडकर या तरुणाच्या फेसबूक अकाउंटवर राज ठाकरे यांचा महिलांच्या केसाचा टोप घातलेला फोटो ठेवून होणार सून मी गांधी घराण्याची असा मजकूर लिहून तो व्हायरल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच राहूल गांधी यांचा फोटो ठेवून सौभाग्यवती राणी राहूल गांधी असाही मजकूर लिहिला आहे. फिर्यादी प्रशांत इंगळे यांनी पुराव्यानिशी पोलिसांत धाव घेतली असून पोलिसांकडून संबंधिताचा शोध सुरु करण्यात आला आहे. 

मनसेचे पदाधिकारी आक्रमक 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्याविरुध्द सोशल मिडियातून आक्षेपार्ह मजकूर टाकलेल्या सागर गुब्याडकर याचा मनसे पदाधिकाऱ्यांकडून शोध सुरु आहे. पोलिसांनी संबंधित तरुणाला तत्काळ अटक करावी अन्यथा राज्यभर आंदोलने केली जातील, असा इशारा मनेसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर यांनी दिला आहे. संबंधित तरुणाविरुध्द पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही महिंद्रकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackerays defamation on Facebook