सीमावासीयांच्या लढाऊ बाण्याला सलाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

बेळगाव : देशातील आर्थिक विषमता कधी न संपणारी आहे. हे वास्तव समोर येऊ नये म्हणून माणसांना भ्रामक सुखाच्या कल्पनात गुंतवून ठेवले जातेय. अशा सर्व लुटीच्या वास्तवात सीमावासीयांनी मराठी भाषेचा लढा जिवंत ठेवलाय. सीमावासीयांच्या लढाऊ बाण्याला सलाम, असे उद्‌गार ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी काढले.

बेळगाव : देशातील आर्थिक विषमता कधी न संपणारी आहे. हे वास्तव समोर येऊ नये म्हणून माणसांना भ्रामक सुखाच्या कल्पनात गुंतवून ठेवले जातेय. अशा सर्व लुटीच्या वास्तवात सीमावासीयांनी मराठी भाषेचा लढा जिवंत ठेवलाय. सीमावासीयांच्या लढाऊ बाण्याला सलाम, असे उद्‌गार ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी काढले.

तसेच कर्नाटकच्या मराठीद्वेषाचा उल्लेख करताना त्यांनी याठिकाणी उद्या ग्यानबा तुकाराम म्हणायला टाळही शिल्लक ठेवले जाणार नाहीत, तेथे मग विठोबाचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला. सांबऱ्यातील (ता. बेळगाव) हायस्कूल मैदानावर 11 वे मराठी साहित्य संमेलन रविवारी (ता. 18) झाले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ""देशात हरितक्रांतीच्या गप्पा होताहेत, पण शेती उजाड करण्याचे शास्त्रशुद्ध प्रयत्न व्यवस्थेकडून होत आहेत. रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशक वापरल्याने निसर्गाचे चक्रच मोडले जातेय. पाखरांनी यावे, अशी शेतीच दिसून येत नाहीय. पाणी आणि खतांचा अतिवापर जमीन नापीक बनवतोय. सकस धान्य पिकत नाहीच. हायब्रीड धान्याची चलती आहे.

आता माणसांचेही हायब्रीडेशन होण्याची शक्‍यता आहे. राजकीय व्यवस्थेने शिक्षणाचे मार्ग बंद करण्याचे प्रयत्न केले. शिक्षण हे संस्कारांचे केंद्र असावे. ही सामान्य व्यवस्थाच पोखरून टाकली आहे. किराणा दुकानाप्रमाणे फोफावलेली शिक्षणाची दुकाने गरिबांची लयलूट करीत आहेत. सरकारी शाळा बंद पाडण्याच्या षड्‌यंत्रात सर्व राजकीय पक्ष व नेते सामील आहेत, अशी खंत व्यक्त केली.

कोणत्याही राजकीय नेत्यांना शिक्षणासाठी दारोदार भटकरणाऱ्या सामान्य माणसांकडे पाहण्याची इच्छा नाही. गरिबांची सामूहिक लूट चाललीय आणि या लुटीत काही बिनचेहऱ्याचे शत्रूही सामील होत आहेत. टीव्हीवरील जाहिरातींमुळे मानसिकता बदलतेय. टीव्हीने माणसाला ग्राहक बनवले. गरज नसलेल्या वस्तूंना अत्यावश्‍यक बनवले. यातूनच सामान्यांचा खिसा कापण्याचे काम प्लॅनिंग करून केले गेले. या बिनचेहऱ्याच्या शत्रूने शेती, शिक्षण बिघडवलेच त्याप्रमाणे आरोग्यही बिघडवले. पूर्वी राखुंडीने लोक दात घासत होते. पण पेस्ट आणि ब्रश आले आणि दातांचे आरोग्य बिघडले अन्‌ कोपऱ्याकोपऱ्यावर दातांचे दवाखाने तयार झाले, असे त्यांनी सांगितले.
स्वार्थी राजकीय व्यवस्थेमुळे सर्वत्र शेतकरी आत्महत्या करीत आहेत. उद्या शिकलेली पोरेही आत्महत्या करतील. कारण कौशल्य आणि बुद्धीपेक्षा पैशांना महत्त्व दिले जातेय. या साऱ्या गुंत्यामधून सुटण्यासाठी माणसांनी स्वत: रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. लढा लढण्यासाठी संघटित व्हावे लागेल, असे आवाहन श्री. गवस यांनी केले.

Web Title: rajan gavas salutes marathi people on karnataka border