तुमची मदत आमच्यापर्यंत पोचलीच नाही...

संजय खूळ
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

जनावरांना चारा मिळावा
गावाभोवती शेतामध्ये चाराच नाही. त्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न बिकट बनला आहे. यासाठी प्रशासनाने गावातील जनावरांच्या चार्‍यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. म्हादगोंडा पाटील, माजी सरपंच

राजापूर (ता. शिरोळ) : ''आमचं गाव संपूर्णपणे पुरानं वेढलं गेलं. एक हजारांहून अधिक कुटुंबांना पुराचा मोठा फटका बसला. आता पूर ओसरला पण, खाण्यापिण्याचे हाल आहेत. जनावरांना चारा नाही. शासकीय मदत तर नाहीच, पण लोकांनी पाठविलेली मदतही आमच्यापर्यंत पोचत नाही. 2005मध्ये आमच्या गावातील 14जण पुरात बुडाले होते. आता आमच्याही मरणाची वाट पाहत आहात का?'' असा संतप्त सवाल शिरोळ तालुक्यातील राजापूर या पूरग्रस्त गावकऱ्यांनी केला आहे.

शिरोळ तालुक्यातील राजापूर या गावाला प्रत्येक पुराच्या वेळी बुडालेल्या बेटाचे स्वरूप येते. यावेळच्या महापुरानं गावाची पूर्ण वाताहत केली आहे. गावाच्या चोहोबाजूंनी असलेली शेती या पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍नही बिकट बनला आहे.

यापूर्वी 2005च्या महापुरात राजापूर हे गाव केंद्रस्थानी होते. संपूर्ण गावाला पाण्याने वेढले होते. तशीच परिस्थिती यावेळी सुध्दा होती. गावाला बेटाचे स्वरूप आले असल्याने चार ते पाच दिवस या ठिकाणी एनडीआरएफ अथवा लष्कराचे जवानही पोहचू शकले नाहीत. 2005 मध्ये बोट उलटून 14 जणांना जलसमाधी मिळाली होती. त्यामुळे यावेळी गावकरी प्रचंड भीतीखाली होते. यावेळी तब्बल एक हजारांहून अधिक कुटुंबे पूरग्रस्त बनली.

हजारो जनावरांचा चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला. पूर काळात या गावाला येणेच शक्य नसल्याने कोणतीच मदत मिळाली नाही. आता मात्र अनेक स्वयंसेवी संस्था मदत घेऊन येत आहेत. मात्र गावाचे उंबरे हजार आणि येणारे मदतीची किट मात्र 100 ते 200. त्यामुळे संपूर्ण गावाला मदत मिळतच नाही. त्यामुळे मदत आमच्यापर्यंत पोहचत नसल्याची खंत अनेक गावकर्‍यांनी व्यक्त केली.

पूर येण्यापूर्वी प्रशासकीय अधिकार्‍यांनी एकदा भेट दिली त्यानंतर पुन्हा इकडे कोणी फिरकलेच नाहीत. त्यामुळे गावकर्‍यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात संतापाची भावना आहे.

मदतीचे सुव्यवस्थित वाटप व्हावे
स्वयंसेवी संस्थाकडून येणारी मदत एकत्र करून ती प्रत्येकापर्यंत पोचविण्याची गरज आहे. प्रत्येक संस्था आम्ही स्वत:च पूरग्रस्तांना मदत देणार अशी भूमिका ठेवत आहेत. हे वाटप केंद्रीत पध्दतीने होण्याची गरज आहे. दुसरीकडे गावकरी वाहून गेल्यानंतरच प्रशासन लक्ष देणार आहे का ?
- गुरू कुंभार, ग्रामपंचायत सदस्य

जनावरांना चारा मिळावा
गावाभोवती शेतामध्ये चाराच नाही. त्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न बिकट बनला आहे. यासाठी प्रशासनाने गावातील जनावरांच्या चार्‍यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. म्हादगोंडा पाटील, माजी सरपंच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajapur people not getting floodhelp