द्रष्टे नेतृत्व...

द्रष्टे नेतृत्व...

दूरदृष्टीने लोकांच्या हिताचा विचार करीत, समाजकार्याला अखंड वाहून घेतलेले राजारामबापू पाटील हे ‘राजकीय संतच’ होते. ‘लोकनेते’ ही जनतेने बापूंना दिलेली उपाधी आहे. बापूंचा स्वभाव सरळ होता. त्यांनी राजकीय जीवनात कधीही कुटिल डावपेच केले नाहीत. त्यामुळे ते लोकप्रिय झाले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त...
 

राजारामबापू व माझी पहिली भेट साधारण ५० च्या दशकातील. लोकल बोर्डाच्या निवडणुकांचा काळ होता. बापू काँग्रेस पक्षातून लढत होते. आम्ही डाव्या बाजूने काम करीत होतो. मी एक तरुण कार्यकर्ता होतो. या निवडणुकीत जोरदार भाषणे करीत होतो. बापूंना माझी बाजू व माझ्या भाषणांची कल्पना होती. ते एका लग्नानिमित्त माझ्या येडेमच्छिंद्र गावात आले असता, त्यांनी मला बोलवून घेतले. तुला समाजसेवेची आवड आहे. तू चांगले बोलतोस. आपण एकत्रित काम करू. सार्वजनिक जीवनात चांगले काम करशील, या शब्दात त्यांनी माझ्या कामाचे कौतुक तर केलेच, शिवाय काँग्रेस पक्ष प्रवेशाचे निमंत्रणही दिले. आणि मीही माझ्या कार्यकर्त्यांसह तातडीने बापूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात सामील झालो. 

बापूंच्या सरळ व हळव्या स्वभावामुळे अनेक घटना, प्रसंग व घडामोडींचा बापूंना त्रास झाला. त्यांनी तो आनंदाने सोसला. बापूंनी संपूर्ण राज्यभर निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी उभा केली. आणि यातील बहुतेक कार्यकर्त्यांनीही त्यांना अखंड साथ दिली. मात्र जे बापूंना सोडून गेले, ते काळाच्या ओघात कधीच निस्तेज व निष्प्रभ ठरले. बापूंच्या उच्च विचार व टापटीप राहणीमानाचा आम्हा कार्यकर्त्यांवर मोठा प्रभाव होता. वारणा नदीवर खुजगाव येथे धरण झाल्यास  शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटेल, असे  बापूंचे मत व प्रयत्न होते. मात्र यातूनच ‘दादा-बापू वाद’ सुरू झाला व पुढे तो वाढला. या विषयी चर्चा करण्यासाठी कऱ्हाडच्या गेस्ट हाउसमध्ये बैठक घेऊ, असा सल्ला यशवंतराव चव्हाण यांनी बापूंना दिला. त्याप्रमाणे चव्हाणसाहेब, स्व. बापू, स्व. दादांची बैठक झाली. आम्ही काही कार्यकर्तेही या बैठकीस उपस्थित होत. या बैठकीमध्ये बापूंनी मला पहिल्यांदा बोलण्यास सांगितले. त्यांनी नेहमी आपल्या कार्यकर्त्यांना मान-सन्मानाची वागणूक दिली आहे. बापू हे कार्यकर्त्याला जपणारे नेते होते. त्यांचे कार्यकर्त्यांवर अतोनात प्रेम होते. कार्यकर्त्यांनी समाजामध्ये काम करताना स्वतःला जपले पाहिजे. आपली व आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे, अशा त्यांच्या कार्यकर्त्यांना नेहमी सूचना असायच्या.

कार्यकर्ता हा ‘वैचारिकदृष्ट्या सक्षम’ हवा. विचारांनी परिपूर्ण, निष्ठावंत कार्यकर्ताच मजबूत संघटना उभा करून समाजाचे  विविध प्रश्‍न प्रभावीपणे मार्गी लावू शकतो, अशी बापूंची धारणा होती. बापू दर महिन्याला एक विभागवार ‘चिंतन शिबिर’ घेत असत. वैज्ञानिक प्रगती शिवाय सामाजिक विकास होऊ शकत नाही, असे बापूंचे चिंतन होते. या चिंतन शिबिरांची जबाबदारी त्यांनी बोरगावचे रामराव देशमुख, शिगावचे विश्‍वासराव पाटील व माझ्यावर सोपवली होती. त्यांची समाजाचे प्रश्‍न सोडविण्याची एक वेगळी पद्धत होती. ते विविध प्रश्‍नांची जाण व माहिती असणाऱ्या कार्यकर्त्यांना मुंबईला बोलावून घेत व त्यांच्याकडून त्या-त्या विषयांची सखोल माहिती घेऊन त्या-त्या विषयाला भिडत असत. त्यावेळी वीज बोर्डात डाव्या आघाडीकडून होणाऱ्या कामगारांच्या वारंवारच्या संपामुळे बोर्डाचे नुकसान तर होतच होते, शिवाय ‘इंटक’चे महत्त्वही कमी होत होते. इंटकचे नेते बापूंना भेटले व त्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. बापूंनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मी व शिगावचे विश्‍वास पाटील यांच्यावर इंटकच्या मजबुतीची  जबाबदारी दिली. आम्ही बापूंच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना अधिक मजबूत केली. वाळवा तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या दुधाचे संकलन करणारा, दुग्ध व्यवसायास प्रोत्साहन देणारा स्वतंत्र दूध संघ स्थापन करण्याचा  आग्रह धरला. बापूंनी ही जबाबदारी माझ्याकडे दिली.

यातून आजचा ‘राजारामबापू सहकारी दूध संघ’ उभा राहिला. हा संघ ‘वाळव्या’सह जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीला चालना देणारा संघ बनला आहे. बापूंनी राजकारण, समाजकारण, सहकार आदी क्षेत्रांच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर क्षेत्रातही काम केले आहे. ग्रामीण भागातील तरुण, शेतकरी व महिलांना सातत्याने अद्ययावत ज्ञान, माहिती मिळायला हवी, त्यांचे प्रबोधन व्हायला हवे, अशी बापूंची तळमळ होती. आचार्य शांताराम गरूड हे इचलकंरजी येथे अशा पद्धतीचे काम करणारी समाजवादी प्रबोधिनी चालवत होते. बापूंनी मला व प्रा. शामराव पाटील यांना ही संस्था पहाण्यास पाठविले. यातूनच आजची ‘राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी’ ही संस्था उभा राहिली. आज ही संस्था वाळवा तालुक्‍याच्या शैक्षणिक प्रगतीचे केंद्रबिंदू बनली आहे. अर्थात हे पहाण्यास बापू हवे होते. बापूंच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!

शब्दांकन - विश्‍वनाथ पाटसुते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com