राजेंद्रअण्णांचा भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रवादीला झटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

आटपाडी : माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेंद्रअण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आज राष्ट्रवादीला अधिकृतपणे सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी देशमुख बंधू यांनी ही घोषणआ करतानाच ते पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढतील असे जाहीर केले. यावेळी भाजपचे गोपीचंद पडळकर, बंडोपंत देशमुख उपस्थित होते. विनाअट दुष्काळी भागाच्या पाण्याच्या प्रश्‍नांसाठी त्यांनी पक्षप्रवेश केल्याचे पृथ्वीराज देशमुख यांनी जाहिर केले.

ते म्हणाले, "देशमुख आणि पडळकर यांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेची निवडणूक कमळ चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. विधानसभेची उमेदवारी वा अन्य कोणतीही अट घातलेली नाही. केवळ टेंभूच्या पाण्याचा आग्रह आहे. येत्या काळात टेंभूला जास्तीत जास्त निधी देऊन दोन वर्षात योजना मार्गी लावली जाईल. देशमुख-पडळकर यांचा एकत्र बसून निर्णय झाला. त्यांच्यामुळे पक्ष ताकदीने उभा राहील.''

राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले,""पाच वर्षे पक्षाचे प्रामाणिक काम करणार मात्र तिकीट मागणार नाही. विना अट पाण्याच्या प्रश्‍नासाठी भाजपात प्रवेश करीत आहे. राज्य, केंद्रात भाजपची सत्ता आहे. भविष्यातही येण्याची जास्त शक्‍यता आहे. त्यामुळे आमची खरी समस्या पाणी आहे. हा प्रश्‍न भाजपच सोडवू शकेल असा आम्हाला विश्‍वास आहे.'' अमरसिंह देशमुख म्हणाले,""तालुका एक करण्यासाठी निर्णय घेतला आहे. पक्षाने गोपीचंद पडळकर यांना विधानसभेची उमेदवारी दिली, तर यांचे ताकदीने काम करू. पडळकरांसोबत चर्चा करून पक्ष प्रवेश आणि जागा वाटपाचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीवर नाराज नाही. काही अडचणी आहेत. कामासाठी निर्णय घेतला आहे.''

'सकाळ' च अचूक
गेल्या आठवडयात राजेंद्रअण्णा भाजपात जाणार असल्याचे वृत्त "सकाळ'ने दिले होते. त्याची जोरदार चर्चा झाली होती. आज ते वृत्त खरे ठरले. अखेर आज घोषणा केली. गेले काही दिवस सकाळच्या वृत्ताबाबत देशमुख-पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये उलट सुलट चर्चा होती. मात्र अखेर "सकाळ'चेच वृत्त खरे ठरले. .

Web Title: rajendra deshmukh switches to bjp