आता अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार

आता अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार

कोल्हापूर - स्टंटबाजी तसेच भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या नगरसेवक सत्यजित कदम यांच्यावर पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘लक्ष्मीपुरीतील रास्ता रोको आंदोलन आमदारांचा स्टंट होता, खासगी लेआउटवर खर्च केलेला निधी या कामासाठी खर्च केला असता तर बरे झाले असते,’ असे विधान कदम यांनी काल (ता. १७) केले होते. त्यास क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले. 

आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘‘नाना घोसाळकर हे २०१४ च्या पराभवाच्या धक्‍क्‍यातून अजूनही सावरलेले नाहीत. मी पाच हजार रुग्णांवर मुंबईत शस्त्रक्रियेसाठी मदत केली. नाना यांच्यावर मुंबईतील एका मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करण्याची आपली तयारी आहे. लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार परिसरातील रस्ता गेली अनेक वर्षे खराब आहे. तेथील शिवसेना शाखेने आंदोलन केले त्यात मी सहभागी झालो म्हणून चुकीचे काय झाले? आंदोलनानंतरच महापालिकेची यंत्रणा येथे कामाला लागली. जनतेच्या हिताच्या आंदोलनाला स्टंटबाजी म्हणत असाल तर यापेक्षा दुर्दैव काय? यासह कदमवाडी परिसरातील खासगी लेआउट निधी खर्चासंबंधी आरोप केले आहेत त्यासंबंधी पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा कदम यांच्यावर दाखल करणार आहे.’’

पीडब्ल्यूडीच्या भ्रष्ट अधिकाऱ्याकडून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा कदम यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत केला, असा आरोप करून क्षीरसागर म्हणाले, ‘‘२० कोटींचा चुराडा करूनही ते माझ्याकडून २३ हजार मतांनी पराभूत झाले. कदमवाडीतील लेआउटला मंजुरी देण्याचे काम जिल्हा नियोजन समितीच्या स्तरावर होते. महापालिका ही जागा त्यांच्या हद्दीत आहे की नाही याचा ना हरकत दाखला देते. आमदार या प्रक्रियेत काम सुचविण्याचे काम करतात. उर्वरित प्रक्रिया प्रशासनाच्या स्तरावर होते. ज्यांनी परवानगी दिली अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. प्रक्रियेत कायदेशीर संबंध नाही. केवळ बदनामी करणे आणि लोकांत संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी आरोप केले आहेत.’’ 

‘‘भेसळीचे पेट्रोल विकणाऱ्या, महापालिकेतील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या कदम यांना आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. गेल्या वर्षी ३ जानेवारीला आंदोलन झाले, तोडफोड झाली, त्यावेळी संरक्षण करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. त्या वेळी कदम हे कुठल्या बिळात जाऊन लपले होते?,’’ असा सवाल क्षीरसागर यांनी केला.

या वेळी माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे, नगरसेवक अभिजित चव्हाण, महेश उत्तुरे उपस्थित होते.

...म्हणूनच बेछूट आरोप
काँग्रेसमधून भाजप-ताराराणी आघाडीत गेलेले कदम हे भाजपचे तिकीट मिळेल या आशेवर होते. मात्र, भाजप-शिवसेनेच्या युतीची शक्‍यता आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याचा त्यांना मार्ग शिल्लक राहिलेला नाही. चर्चेत राहण्यासाठी ते असे बेछूट आरोप करत असल्याची टिका आमदार क्षीरसागर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com