पवारवाडीच्या राजकुमारला सुवर्णपदक 

सुनील शेडगे 
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नागठाणे - दुर्गम भागातील गाव. पावसाळ्यात संततधार, तर उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य. घरी अठरा विश्वे दारिद्य्र. कधी काळी पोहणेही ठाऊक नव्हते. योगायोग असा, की त्याच राजकुमारने "क्रीडा प्रबोधिनी'त दाखल झाल्यावर पोहण्याच्याच स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरचे सुवर्णपदक पटकावले. 

नागठाणे - दुर्गम भागातील गाव. पावसाळ्यात संततधार, तर उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य. घरी अठरा विश्वे दारिद्य्र. कधी काळी पोहणेही ठाऊक नव्हते. योगायोग असा, की त्याच राजकुमारने "क्रीडा प्रबोधिनी'त दाखल झाल्यावर पोहण्याच्याच स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरचे सुवर्णपदक पटकावले. 

थक्क करणारी ही कहाणी पवारवाडी (ता. सातारा) येथील राजकुमार मारुती पवार याची. पवारवाडी हे ठोसेघर परिसरातील गाव. राजकुमारला बालपणापासूनच खेळाची आवड. चपळपणा, काटकपणा, जिद्द हे त्याच्या अंगचे मूळचे गुण. गणेश शिंदे या शिक्षकांनी त्याला पैलू पाडले. राजेंद्र घोरपडे, कुंडलिक जगदाळे, अरविंद अवसरे, विनोद शिंगाडे, युवराज कणसे, मनोहर माने, अरविंद भोईटे, वैशाली महामुनी यांचेही त्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्यातून जिल्हा परिषद शाळेच्या या मुलाची 2011 मध्ये पुण्यातील बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत निवड झाली. एरवी पोहणे ठाऊकही नसलेल्या राजकुमारची शरीरयष्टी पाहून त्याला याच क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या सात वर्षांच्या काळात राजकुमारने त्यात विशेष प्रावीण्य संपादन केले. त्यातून चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या 19 वर्षांखालील कॅथलोन क्रीडा प्रकारात (750 मीटर पोहणे व पाच किलोमीटर धावणे) त्याने राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या कामगिरीचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे. 

मान्यवरांकडून सत्कार 
या देदीप्यमान यशाबद्दल पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, जयश्री गुरव आदींच्या उपस्थितीत राजकुमारचा विशेष सत्कार करण्यात आला. पवारवाडीतही त्याच्या यशाचे कौतुक होत आहे.

Web Title: Rajkumar pawar Gold Medal