ज्ञान मंदिरातील लेकी गेल्या कुठे?

सुधाकर काशीद
शनिवार, 12 जानेवारी 2019

कोल्हापूर - या शाळेचे नाव राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूल. बहुजन समाजातल्या मुलींनी शिकावे, केवळ मुलींना स्वतंत्र अशी शाळा असावी म्हणून तब्बल ६४ वर्षांपूर्वी कोल्हापूर नगरपालिकेने ही शाळा सुरू केली. शुक्रवार, बुधवार, उत्तरेश्‍वर, रंकाळावेश, शनिवार पेठ अशा बहुजन समाजातल्या परिसरातील मुलींनी त्यामुळे शिक्षणाची संधीही घेतली.

कोल्हापूर - या शाळेचे नाव राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूल. बहुजन समाजातल्या मुलींनी शिकावे, केवळ मुलींना स्वतंत्र अशी शाळा असावी म्हणून तब्बल ६४ वर्षांपूर्वी कोल्हापूर नगरपालिकेने ही शाळा सुरू केली. शुक्रवार, बुधवार, उत्तरेश्‍वर, रंकाळावेश, शनिवार पेठ अशा बहुजन समाजातल्या परिसरातील मुलींनी त्यामुळे शिक्षणाची संधीही घेतली.

एक वेळ शाळेतील मुलींची संख्या १५०० वर गेली; पण आज या शाळेत आठवी ते दहावी या तीन वर्गांत मिळून ४२ मुली आहेत. सगळं शिक्षण, गणवेश मोफत आहे; मग या शाळेतल्या जिजाऊंच्या लेकी गेल्या कोठे, हा विचार करायला लावणारा प्रश्‍न आहे.

उत्तरेश्‍वर, धोत्री गल्ली परिसरातील जिजाऊंच्या नावाने असलेली ही शाळा एके काळी कोल्हापूरचे भूषण होती. सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रांत राजमाता शाळेच्या मुलींचीच बाजी होती. केवळ मुलींसाठी मोफत शाळा सुरू करणारी नगरपालिका म्हणून कोल्हापूरची ख्याती महाराष्ट्रात झाली होती. गुलाबी फ्रॉक, केसांच्या वेण्या, त्याला लाल रिबिन ही या शाळेतल्या मुलींची गणवेशाची खासियत होती.

या शाळेतल्या पोरीही आक्रमक. शाळेच्या आसपास फिरणाऱ्या उडाणटप्पूंना जागेवर भानावर आणायच्या. या शाळेत बहुजन समाजातल्या ३० ते ३५ हजार मुली शिकल्या; पण अलीकडच्या काळात ही शाळा इतर शाळांच्या तुलनेत साधी दिसू लागली. गुलाबी फ्रॉक, केसाच्या वेण्या, त्याला रिबिन... असला गणवेश म्हणजे खूप साधा असे मानणारी एक पिढी तयार झाली.

आकर्षक इमारत, गॅदरिंग, ट्रॅडिशनल डे असे वातावरण असलेल्या शाळांची क्रेझ वाढली. गणवेश, पुस्तकांपासून ते केएमटीचा पास मोफत असतानाही ही शाळा नव्या पिढीला नको वाटू लागली. मुलगी कुठल्या शाळेत यावर मूल्यमापन होऊ लागले व शाळेतील पटसंख्या कमी होऊ लागली.

२०१६ मध्ये तर पटसंख्या वाढविण्यासाठी मुलांनाही प्रवेश देण्यास सुरवात झाली. आज आठवी ते दहावी या तीन वर्गांत मिळून ३७ मुले व ४२ मुली आहेत. पाच शिक्षक आहेत. या शाळेत प्रवेशाला एक पैसा नाही. गणवेश मोफत आहे. पुस्तके मोफत आहेत. केएमटी बस पास मोफत आहे; पण शाळेत शिकायला येण्यासाठी जिजाऊंच्या लेकींचीच कमी आहे.

या शाळेत मुलींनी प्रवेश घ्यावा. शाळेची उज्ज्वल परंपरा अखंडित राहावी म्हणून आम्हा शिक्षकांचे प्रयत्न सुरू आहेत. शाळेच्या दारात जिजाऊंचा पुतळा आहे. जिजाऊ ही आपली स्फूर्ती आहे. पुन्हा या शाळेला भरभराटीचे दिवस आणणे हाच जिजाऊंना मुजरा आहे.
- रंजना जाधव,
मुख्याध्यापिका

Web Title: Rajmata Jijau birth anniversary special

टॅग्स