‘ईव्हीएम’मधून ४५९ मते जादा निघाल्याचा राजू शेट्टींचा आरोप

‘ईव्हीएम’मधून ४५९ मते जादा निघाल्याचा राजू शेट्टींचा आरोप

कोल्हापूर - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएम घोटाळा झाला आहे. हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर तब्बल ४५९ मते ईव्हीएममधून जादा निघाली, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. श्री. शेट्टी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघातून लोकांनी दिलेल्या मतांपेक्षा जादा मतांची नोंदणी झालेली आहे. असाच प्रकार हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील घडल्याने एकच खळबळ उडाली. हातकणंगले मतदारसंघात झालेल्या मतांपेक्षा ईव्हीएम मशिनमधून ४५९ जादा मते निघाली आहेत. ईव्हीएमव्दारे  झालेल्या प्रकाराबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह मित्रपक्षांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. या मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

मतमोजणीपूर्वीच शेट्टी यांनी ईव्हीएम घोटाळ्याची वाच्यता केली होती. मतमोजणीच्या आदल्या रात्री मतमोजणी केंद्राबाहेर असणाऱ्या रस्त्यावर ‘वाय-फाय’ चे सिग्नल दिसू लागले होते.
मोबाईलवर या ‘वाय-फाय’ सिग्नलची नोंद झाल्यानंतर शेट्टी यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला; मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळेच शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे आपली तक्रार नोंदवली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर ईव्हीएममधून जादा निघालेली ४५९ मते पाहता ‘दाल में कुछ काला लगता है’ अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

हातकणंगलेमधील मतदान
ईव्हीएमद्वारे झालेले - १२,४५,७९७
ईव्हीएममधून मोजलेली मते- १२,४६,२५६
एकूण जादा झालेली मते - ४५९
(यात पोस्टलची मते धरलेली नाहीत.)

‘ईव्हीएम’बाबतचा संशय वारंवार व्यक्त करण्यात आलेला होता. मतमोजणीच्या आदल्या रात्री मतमोजणी केंद्रावर भेट दिली असता त्या ठिकाणी ‘वाय-फाय’चे सिग्नल आढळून आले. याबाबतही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतमोजणीनंतर आता मोजलेल्या मतांमध्ये फरक आढळून आला आहे. एकूणच, ही सर्व प्रक्रिया संशयास्पद वाटत आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने याबाबत योग्य ती कार्यवाही तत्काळ करावी.

- राजू शेट्टी, माजी खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com