राज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांत सक्षम उमेदवार देणार - राजू शेट्टी

राज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांत सक्षम उमेदवार देणार - राजू शेट्टी

जयसिंगपूर - ‘विधानसभेसाठी भाजप-शिवसेना सोडून अन्य कोणत्याही पक्षाबरोबर युतीचा पर्याय खुला आहे. राज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांत सक्षम उमेदवार देण्याची तयारी केली आहे. लोकसभेची आघाडी गृहीत धरून आहे. जागा वाटपाबाबत मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही तर अन्य पर्यायही खुले करू. यातही जमले नाही तर स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाऊ,’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केली. याचवेळी त्यांनी आपण विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचा मोठा खुलासा करून सुरू असलेल्या चर्चेवर पडदा टाकला आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष, स्वाभिमानी युवा-युवती आणि महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची दोनदिवसीय बैठक बुधवारी पुण्यातील शुभारंभ हॉलमध्ये झाली. सुमारे पावणेदोनशे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीतील राजू शेट्टी यांचा पराभव, विधानसभेसाठीची व्यूहरचना, राज्यातील प्रत्येक मतदारसंघाचा आढावा आणि तेथील प्रश्‍न आदींबाबत ऊहापोह झाला. 

जिल्ह्यातील पाच जागांवर दावा
 ६ व ७ जुलैला होणाऱ्या ‘स्वाभिमानी’च्या चिंतन बैठकीत कोल्हापूर आणि सांगलीतील राजकीय घडामोडींवर चर्चा होईल. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, राधानगरी, भुदरगड, हातकणंगले, चंदगड व पन्हाळा मतदारसंघावर स्वाभिमानीने दावा केला आहे.

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘भाजपने शेतकरी वर्गासह सर्वच घटकांची निराशा केली आहे. निवडणूक निकालाबाबत आम्ही संभ्रमात आहोत; मात्र शेतकऱ्यांसाठी चळवळ असून, अखेरच्या श्‍वासापर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठीच कार्यरत राहणार आहे. निवडणुकीच्या निकालाचा चळवळीवर कोणताही परिणाम होणार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवून देऊ. यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे.’’ 

ते म्हणाले, ‘‘राज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांत स्वाभिमानीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आज ४९ जागांवर आपण ठाम आहोत. लोकसभेची आघाडी गृहीत धरून नियोजन केले जात असले तरी जागा वाटपात न्याय मिळायला हवा. भाजप-सेनेशिवाय कोणताही पर्याय स्वीकारण्याची मानसिकता आहे. वेळ पडल्यास स्वबळाचीही तयारी असेल.’’ यावेळी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रा. जालिंदर पाटील, प्रकाश पोफळे, दशरथ सावंत, पूजा मोरे, हंसराज वडगुले, अमोर हिप्परगे उपस्थित होते.  

विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीची ताकद दिसेल. भाजप-सेना विरोधकांची मोट बांधू. जागा वाटपात समाधानकारक तोडगा न निघाल्यास स्वबळाचा मार्ग रिकामा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न केंद्रात सुटू शकतात. त्यामुळे विधानसभा 
लढणार नाही. पुन्हा महिन्याने राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन निर्णय स्पष्ट करू. 
- राजू शेट्टी,
अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

बैठकीतील ठराव
* राज्याच्या कृषी क्षेत्राचा आर्थिक वेग उणे ८ टक्‍के इतका खालावलेला आहे. शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी विनाअट सरसकट सात-बारा कोरा व शेतीचे संपूर्ण वीज बिल माफ करून नव्याने सुरवात करावी. यासाठी शासनाने कर्जमाफी व वीज बिल माफी निर्णय त्वरित घ्यावेत. 
* खरिपाच्या पेरण्या संपत आल्या तरी अद्यापही केंद्र सरकारने खरिपाचे हमीभाव जाहीर केले नाहीत. यावरून सरकारची शेतीबद्दलची अनास्था दिसून येते. स्वामिनाथन यांच्या सूत्रानुसार हमीभाव जाहीर करावा. 
* दुष्काळ हाच निकष धरून ज्या जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे, त्या जिल्ह्यातील पीक विमा भरणा केलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची जोखीम रक्कम तत्काळ द्यावी.
* शेतकऱ्यांना २० जुलैपर्यंत खरिपासाठी पीक कर्ज देण्याचे आदेश बॅंकांना द्यावेत. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होत असेल तर स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. 
* शेतकरी सतीश सुंदरराव सोनवणे (रा. आदेगाव, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी लोकमंगल माऊली शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्यास ऊस पुरविला होता. अनेक हेलपाटे घालूनही ऊस बिल मिळाले नाही म्हणून त्यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांचा हा कारखाना आहे म्हणून पोलिसांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करणे टाळले आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत व नैतिक जबाबदारी स्वीकारून देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. 
* राज्य शासनाने दुधाच्या प्लास्टिक बंदीचा फेरविचार करावा. 
* केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात प्रोत्साहन बंद केल्याने कांद्याचे दर प्रतिक्विंटल चारशे रुपयाने कोसळले आहेत. केंद्राने ताबडतोब निर्यात अनुदान सुरू करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com