व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले

व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले

कोल्हापूर - ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या व्यवस्थांनी शेतकऱ्यांनाच ओरबडण्याचे काम केले. किंबहुना, अनेकांनी शेतकऱ्यांना लुटण्यातच धन्यता मानली. हजारो वर्षांपासून हा लुटीचा इतिहास असाच आहे’, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

येथील ताराराणी विद्यापीठातर्फे आयोजित ‘भारतीय शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना व दशा-समस्या व आव्हाने’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन श्री. शेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे उपाध्यक्ष एस. एन. पवार अध्यक्षस्थानी होते. 

श्री. शेट्टी म्हणाले, २० वर्षांत देशात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कोणी स्वतःची चित्ता रचून, कोणी मुलांना सोबत घेऊन, तर कोणी विजेचा शॉक घेऊन या आत्महत्या केल्या. अंगावर शहारे आणणाऱ्या या आत्महत्या केवळ ३५ हजार रुपये कर्जापोटी झाल्या. राज्य सरकारच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार लाख-सव्वा लाख रुपये असेल आणि ३५ हजारांसाठी शेतकरी जीव देत असेल तर याला जबाबदार राज्यकर्त्यांबरोबरच आपणही आहोत. 

ते म्हणाले, राज्यकर्ते काही परदेशातून आलेले नाहीत. आमच्याच अपेक्षांचे ओझे घेऊन ते निवडून येतात; पण ज्याची प्रतिकार शक्ती कमी अशा दुबळ्या शेतकऱ्यांच्या विरोधातच ते धोरण ठरवतात. ७० वर्षांत गोदामे भरून जातील एवढे धान्य शेतकऱ्यांनी उत्पादित केले. 

एकेकाळी धान्याच्या बाबतीत परावलंबी असलेला हा देश स्वावलंबी झाला; पण तो करणारा शेतकरी आज कुठे आहे? याचा विचार करण्याची गरज आहे. शेतीवर अवलंबून असलेल्यांची संख्याही घटत आहे. शेतकऱ्यांची खळी ओरबडण्यापलीकडे या देशात काहीही झालेले नाही. 
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘शेतीत सर्वाधिक काम महिला करतात. किंबहुना, शेतीचा शोधच महिलांनी लावला आहे. इतिहासात त्याला पुरावेही आहेत. परंतु, चूल आणि मूल यापलीकडे महिलेची ओळख झालेली नाही. शेती स्थिर झाल्यानंतर त्याचा ताबा पुरुषांनी घेतला.

ते म्हणाले, शेतीसाठी पेरणीपासून ते कापणीपर्यंत लागणाऱ्या सर्व वस्तू गावांतच तयार होत होत्या. मात्र, आज याच वस्तू विकत आणाव्या लागतात. पूर्वी धान्याच्या किंवा पिकाच्या बदल्यात पिकेच विकत घेतली जायची; आज पैशाच्या स्वरूपात हा व्यवहार होतो. अलीकडे शेती ही उद्योगावर अवलंबून राहू लागली, हीच या व्यवसायासमोरची मोठी व्यथा आहे. 

माजी आमदार संपतराव पवार यांचेही भाषण झाले. यावेळी गेल ऑम्वेट, प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, स्कॉट कॅफोरा, प्रा. जालंदर पाटील आदी उपस्थित होते. अनघा पाठक यांनी प्रास्ताविक केले. नीता धुमाळ यांनी स्वागत केले. डॉ. वर्षा मैहंदर्गी यांनी परिचय करून दिला. डॉ. सुजय पाटील यांनी आभार मानले. 

पंतप्रधानांच्या ५६ इंच छातीचा काय उपयोग?

इकडे शेतकरी अडचणीत, तर सीमेवर शेतकऱ्यांची पोरं धारातीर्थ पडत असताना ५६ इंच छातीचा काय उपयोग? असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच त्यांचे नाव न घेता निशाणा साधला. जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.  

शेट्टी म्हणाले, ‘या अतिरेकी हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. नुसते निषेध आणि खलिते पाठवून उपयोग नाही, तर साधने असून त्याचा उपयोग काय? त्यांच्यावर हल्ला करूनच याचे उत्तर देण्याची गरज आहे. या मुद्यावर राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे.’साखरेचा हमीभाव वाढला आहे. त्याचबरोबर निर्यात साखरेला वाहतूक खर्च व अनुदान कारखानदारांना मिळणार आहे.  कारखानदारांनी आता नाटाळपणा सोडून शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी द्यावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com