रयत विकास आघाडी नेत्यांचा "इगो' झाला जागा 

रयत विकास आघाडी नेत्यांचा "इगो' झाला जागा 

इस्लामपूर - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी वगळून उदयास आलेल्या वाळवा तालुक्‍यातील रयत विकास आघाडीतील नेत्यांचा "इगो' जागा झाला आहे. निवडणुकीनंतर "आघाडीचे नेते' अशी नवी ओळख झालेल्या मंत्री सदाभाऊ खोत व आमदार शिवाजीराव नाईक यांचा शब्द डावलला जात असल्याचे दिसत आहे. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील खासदार राजू शेट्टी व श्री. खोत यांच्या वादाची किनार आहे. 

वाळवा तालुक्‍यातील सर्वपक्षीयांचा विरोधक कोण तर जयंत पाटील असे एक सुरात सर्वजण म्हणतात. जयंत पाटील यांनी आजपर्यंत तालुक्‍यातील राष्ट्रवादी विरोधकांना त्यांच्या ताकदीप्रमाणे त्यात्या जागी थांबायला भाग पाडले. त्यांचे ते कसबच आहे. कोणाला किती मोठे करायचे, ऐनवेळी कोणाला खाणाखुणा करायच्या यात ते वाकबगार आहेत. कोणत्याही निवडणुकीनंतर त्यांचा हा कार्यक्रम सुरू असतो. त्याची जाणीव सर्व विरोधकांना झाल्यानंतर "हम सब एक है' चा नारा देत नगरपालिका व जिल्हा परिषदेत सारे एक झाले. सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपदसुद्धा त्याला तितकेच कारणीभूत ठरले. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधक एकत्र झाले. शिवसेना विकास आघाडीत राहून स्वबळावर लढली. पालिकेत सत्ताबळ दाखवताना शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना काय करेल याचा अंदाज नव्हता. यात विकास आघाडीची दमछाक झाली. नगरपालिकेतील गोड (?) अनुभव टाळण्यासाठी जिल्हा परिषदेसाठी परत एकदा विकास आघाडीची जुळणी झाली. ज्यांना आघाडीच्या चिन्हावर लढायचे असेल त्यांनीच आघाडीत या, ही अट कायम ठेवण्यात आली. आघाडीचे नेते सदाभाऊ खोत व शिवाजीराव नाईक यांच्या नावाची घोषणा करून ते घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असे सांगण्यात आले. सर्वजण एकदिलाने लढले. राष्ट्रवादीचा झंझावात मोडून काढत आघाडीला वाळवा तालुक्‍यात चार जागा मिळाल्या. नशिबाने जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत आघाडी किंगमेकर ठरते आहे. सदाभाऊंनी विकास आघाडी भाजपसोबत राहील, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या दिवशी माध्यमांजवळ व्यक्त केली. इथंच माशी शिंकली. राहुल महाडिक यांनी आम्हाला कोणीच गृहीत धरू नका, अशी प्रतिक्रिया देत भाऊंना चेकमेट देण्याचा प्रयत्न केला. 

झेडपी निवडणुकीत शेट्टी आणि सदाभाऊ संघर्ष सुरू झाला. तो विकास आघाडीचा पाठिंबा कोणाला यातही घुसला. स्वाभिमानीचा संघर्ष विकास आघाडीत आल्याने विकास आघाडीचे नेते कोण ? या बाबत विकास आघाडीत मतभेद सुरू झाले. सदाभाऊंचा कल भाजपकडे आहे. मात्र भाजपवर नाराज असलेल्या शेट्टींना जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत भाजपला गुडघ्यावर आणायची संधी चालून आली. त्यांनी विकास आघाडीतील मतभेदाला मांडीआडून पाणी घालणे सुरू केले. मंगळवारी सदाभाऊंनी सी. बी. पाटील व गौरव नायकवडी यांची भेट घेत राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, आम्ही कोणाच्या गटाचे नाही. विकास आघाडीचे आहोत इथंपर्यंत चर्चा घडवून आणल्या. सकाळी 11 च्या या घटनेनंतर सायंकाळी पाचनंतर वैभव नायकवडी यांनी विकास आघाडी अभेद्य, सदाभाऊंचा नामोल्लेख टाळत शेट्टी व आम्ही एकत्र बसून पाठिंब्याबाबत निर्णय घेऊ, अशी घोषणा केली. सर्व घडामोडीत सदाभाऊ खोत व राजू शेट्टींचा वाद विकास आघाडीत घुसल्याचे दिसते. सदाभाऊ समर्थकांत याबाबत नाराजी आहे. आघाडी स्थापनेपासून प्रचारसभा, रणनीती आखण्यासाठी सदाभाऊ चालतात, मग पाठिंब्याबाबत ते का चालत नाहीत. राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही, असे एकासुरात म्हणतात. मग राष्ट्रवादी नसताना भाजपची सत्ता जिल्हा परिषदेत येणार आहे. मग सदाभाऊंना त्याचे श्रेय जाऊ नये यासाठी सर्व खटाटोप सुरू आहे का? असे सदाभाऊ समर्थकांचे म्हणणे आहे. 

विकास आघाडीतील सारे घटक निवडणुकीपूर्वी आम्ही सर्व एक आहोत, असे म्हणत होते. आता प्रत्येकाने सवतासुभा मांडला आहे. यावरून आघाडीतील नेत्यांना "इगो'ची लागण झाल्याचे स्पष्ट होते आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com