भाजपच्या डावपेचांना भीक घालत नाही- खासदार राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील महिन्यात नियोजित असलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत राज्य सरकारचा पाठींबा काढून घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर राजू शेट्टी म्हणाले, "वेळ येवू द्या, बघाच. पुढे काय काय होतेय ते.''

सांगली- शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्यावर राज्यात आत्मक्‍लेष पदयात्रेचे वातावरण तापलेले असताना त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. अशा खेळी करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कमी होणार नाही. भाजपच्या डावपेचांना मी भीक घालत नाही, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी आपली भूमिका व्यक्त केली. 

पुण्यातून उद्या (ता. 22) सुरु होत असलेल्या आत्मक्‍लेष पदयात्रेच्या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानीचे बडे नेते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुढे आली आहे. त्याविषयी त्यांनी "सकाळ'कडे भूमिका मांडली. सदाभाऊंच्या भाजप प्रवेशाबाबत ""मी या मुद्यावर निरुत्तर नाही, मात्र वेळ आली की मी उत्तर देईन'', असे सांगत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. 
ते म्हणाले, "सरकार कितीही ताकदवान असले तरी जनमताचा आवाज दाबू शकत नाही, हे आम्ही लोकसभेत जमीन अधिग्रहणाच्या विधेयकावर दाखवून दिले आहे. केंद्रात भाजपला पूर्ण बहुमत असताना जनमतासमोर झुकावे लागले. राज्यातून आम्ही तेवढा जनरेटा आताही उभा करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी हा लढा आहे. त्यात संवेदनशील समाजातील विचारवंत, बुद्धिवादी, कलावंत, डॉक्‍टर अशा लोकांना सोबत घेतोय. ते शेतकऱ्यांच्या पाठीशी असतील तर सरकारवर अधिक नैतिक दबाव असेल. एक दिवस आमच्यासोबत चाला, शेतकऱ्यांची दुखणी समजून घ्या, असे आवाहन आम्ही या लोकांना केलेय. तुफान प्रतिसाद मिळतोय.'' 

सरकारचा आवाजच मोठा 
श्री. शेट्टी म्हणाले, "मोठ्याने बोलले, तावातावाने भाषण केले, रेटून बोलले की काम केले, असे म्हणत नाहीत. त्याला कामच करावे लागते. घोषणांच्या पावसाने पोट भरत नाही. स्वामीनाथन समिती शिफारशी लागू करण्याची घोषणा कुणाची होती? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, अशी वल्गना कुणी केली होती? तूर 18000 वरून 4000 रुपयांवर आली. 5 लाख शेतकऱ्यांनी शेततळी देणार होते, दिले 5200 लोकांना. देवधर्मावर मुक्तहस्ते उधळण करण्याऐवजी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला हवी होती. आतापर्यंत 45 हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या विधवांना शोषणाला सामोरे जावे लागतेय. देवधर्मावर 10 हजार कोटी खर्च करणाऱ्या सरकारने या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे 600 ते 700 कोटी रुपये कर्जमाफ केले असते तर त्या आत्म्यांची पुण्याई लागली असती. सरकारला माणसापेक्षा देवाचीच चिंता जास्त लागलीय.'' 

स्वाभिमानी रबरी बॉल 
खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तुलना रबरी बॉलशी केली. ते म्हणाले, ""स्वाभिमानीला जितके दाबण्याचा प्रयत्न कराल, तितकी ती उसळी मारून उभी राहील, रबरी बॉलसारखी.'' 

वेळ येवू द्या, बघाच 
स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील महिन्यात नियोजित असलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत राज्य सरकारचा पाठींबा काढून घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर राजू शेट्टी म्हणाले, "वेळ येवू द्या, बघाच. पुढे काय काय होतेय ते.''

Web Title: Raju shetty speaks about his stand on farmers issue