निधीअभावी रखडला बळीराजाचा "सन्मान'

तात्या लांडगे
रविवार, 1 डिसेंबर 2019

- राज्यातील 26 लाख शेतकऱ्यांना निधीची प्रतीक्षा
- मागील 10 महिन्यांपासून मिळाला नाही एकही दमडा
- 62 लाख 43 हजार शेतकऱ्यांना मिळाला दोन हजारांचा हप्ता
- 54 लाख 61 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा
- 63 लाख शेतकरी तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेतच

सोलापूर : राज्यातील 88 लाख 67 हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून 10 महिन्यांचा काळ लोटला, तरीही 26 लाख 24 हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही. आतापर्यंत राज्यातील 62 लाख 43 हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता तर 54 लाख 61 हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि 26 लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम वितरीत करण्यात आली आहे. निधीअभावी शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब होतोय, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हेही आवर्जुन वाचा...अबब...729 जागांसाठी सव्वातीन लाख उमेदवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2018 रोजी देशातील दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्या बळीराजाला दरवर्षी सहा हजार रुपये देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. त्यानुसार महाराष्ट्रातील 88 लाख 67 हजार शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारला अपलोड करण्यात आली. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार 862 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. महापूर, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या बळीराजाला केंद्र सरकारकडून अद्याप पुरेसा निधी मिळालेला नाही. या योजनेतून दरवर्षी दोन हजारांप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र, मागील 10 महिन्यांपासून राज्यातील 26 लाख शेतकऱ्यांना सन्मान निधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे सुमारे 63 लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळालेली नाही. केंद्र सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होण्यास विलंब होत असल्याचे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

हेही आवर्जुन वाचा...ज्येष्ठ नागरिकांसाठी या शहरात दिलासा

सन्मान निधी योजनेची राज्याची सद्यस्थिती
एकूण पात्र शेतकरी
88.67 लाख
पहिला हप्ता मिळाला
62.43 लाख
दुसरा हप्त्याचे पैसे मिळाले
54.61 लाख
तिसरा हप्ता मिळाला
26.05 लाख
काहीच न मिळालेले शेतकरी
26.24 लाख
 

 

हेही आवर्जुन वाचा...खुषखबर...! या शहरात येणार 100 कृषी हवामान शास्त्रज्ञ

शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड
प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 88 लाख शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड केली आहे. आतापर्यंत 62 लाख 43 हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता तर 54 लाख 61 हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि 26 लाख पाच हजार शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्‍कम मिळाली आहे.
- जयंत टेकाळे, उपायुक्‍त, कृषी, मुंबई

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rakesh victim's "honor" over lack of funds