नात्‍यांची विण केली रक्षाबंधनाने घट्ट...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सांगली - बहीण-भावाचे अतूट नाते रेशमी धाग्यांनी विणणारा रक्षाबंधन सण सांगली आणि परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाची ओवाळणी देण्यासाठी शहरातील ‘गिफ्ट’ सेंटर, मोबाईल दुकाने, मॉल, कापडपेठ, सराफ कट्टा येथे गर्दी दिसून आली. ‘सोशल मीडिया’वर देखील कालपासून आज दिवसभर बहीण-भावांच्या नात्यांची वीण घट्ट करणारे संदेश ‘फॉरवर्ड’ होताना दिसले.

रक्षाबंधनानिमित्त आठवडा- भरापासून सांगलीतील प्रमुख रस्त्यांवर रंगीबेरंगी राख्यांचे स्टॉल सजले होते. लहान मुलांसाठी छोटा भीम, डोरेमान आणि कार्टूनच्या राख्या यंदा मोठ्या प्रमाणात बाजारात आल्या होत्या. म्युझिक आणि छोट्या बल्बचा उजेड पाडणाऱ्या राख्यांनाही पसंती मिळाली. सराफ पेठेत अनेक दुकानात चांदीच्या राख्यांना मोठी मागणी दिसून आली.

तसेच नेहमीचे रंगीबेरंगी गोंडे, काचेचे स्टोन आणि रंगीत धाग्यात विणलेल्या राख्यांनाही भगिनींनी पसंती दिली. पूर्वीचा भल्या मोठ्या राख्यांचा ट्रेंड बदलल्यामुळे नवीन प्रकारच्या राख्यांना मागणी वाढल्याचे चित्र यंदाही दिसले. दूरगावी असलेल्या भावांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट कार्यालये, कुरिअर सेवेचा वापर केला गेला. 

रक्षाबंधन आणि रविवारची सुटी असा योग जुळून आला. त्यामुळे बसस्थानके, रेल्वेस्थानक तसेच खासगी वाहतूक जोमात असल्याचे चित्र काल आणि आज दिसले. रक्षाबंधनाला बहिणीला भेट देण्यासाठी सराफ कट्टा, कापडपेठ, शहरातील मॉलमधील शोरूम, गिफ्ट सेंटर येथे गर्दीचे चित्र दिसले. तसेच मिठाईची दुकाने आणि बेकरीमध्ये पेढे, बर्फी, कलाकंद आदी गोड पदार्थांची उलाढालही मोठ्या प्रमाणात झाली. रक्षाबंधनानिमित्त शहर परिसरासह सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसले.

बहीण-भावाच्या प्रेमाचे नाते आणि महत्त्व सांगणारे मेसेज काल ‘ॲडव्हान्स’मध्ये सोशल मीडियावर फिरत होते. तर आज सकाळपासूनही संदेशाची देवाण-घेवाण सुरू होती. बहीण-भावांच्या ‘सेल्फी’ला देखील अनेकांनी दाद दिली. अगदीच दूरवर असलेल्या भावाशी संवाद साधण्यासाठी ‘व्हॉटस्‌ ॲप’वरील ‘व्हिडिओ कॉलिंग’चा वापर केला गेला.

Web Title: Rakshabandhan Relation