खंडपीठासाठी कोल्हापूरकर म्हणून रॅलीत सहभागी व्हा 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवावा लागेल. हा केवळ वकिलांचा प्रश्‍न नसून जनतेचाही असल्याने एक कोल्हापूरकर म्हणून बुधवारी (ता. 1) होणाऱ्या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर हसीना फरास यांनी केले. महाराणा प्रताप चौकात आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस शहरातील प्रमुख संस्था, तालीम मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवावा लागेल. हा केवळ वकिलांचा प्रश्‍न नसून जनतेचाही असल्याने एक कोल्हापूरकर म्हणून बुधवारी (ता. 1) होणाऱ्या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर हसीना फरास यांनी केले. महाराणा प्रताप चौकात आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस शहरातील प्रमुख संस्था, तालीम मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होईपर्यंत दीर्घ लढा सुरू ठेवावा लागणार आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत झाला. माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, ""खंडपीठासाठी अनेकदा आंदोलन केले आहे; पण शासनाने अजूनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता जनतेचाच दबाव वाढवावा लागेल.

आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला हे करायचे आहे.'' कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रकाश मोरे म्हणाले, ""खंडपीठासाठी सहा जिल्ह्यांतील वकील गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. आता न्यायालयासमोरही आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाने याची दखल घ्यावी म्हणून 1 फेब्रुवारीला शहरातून रॅली काढण्याचे नियोजन आहे. यामध्ये शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.'' शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण म्हणाले, ""कोल्हापूरला आंदोलनाशिवाय काहीच मिळत नाही. खंडपीठासाठीचा हा लढा अनेक वर्षांपासूनचा आहे. आता हा लढा आणखीन बळकट करण्याची गरज आहे.'' मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, ""कोल्हापूरला खंडपीठ मंजूर व्हावे, यासाठी शासनावर दबाव आणण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने या लढ्यात सहभागी व्हावे.''

जनशक्तीचे सुभाष वोरा यांनी या लढ्यात सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनीही मुंबईचे हेलपाटे मारून पक्षकार कर्जबाजारी होत आहेत. त्यामुळे खंडपीठ मंजूर करण्याची आता हीच योग्य वेळ आहे, असे मत व्यक्त केले. या वेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रज, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, महेश जाधव, चंद्रकांत यादव, दिलीप पोवार, सतीशचंद्र कांबळे, महापालिकेतील कॉंग्रेसचे सभागृह नेते प्रवीण केसरकर, अजित राऊत, बजरंग शेलार, लाला भोसले, लाला गायकवाड, शोभा कवाळे, ऍड. महादेवराव आडगुळे, ऍड. अशोकराव साळोखे, समीर नदाफ आदींसह शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: rally in Kolhapur for bench of high court