प्रचार रथ, पथनाट्य, कोपरा सभा तर कुठे हायटेक यंत्रणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचे काटेकोर नियोजन केले आहे. प्रचार रथ, पथनाट्य, कोपरा सभा तर कुठे हायटेक यंत्रणा या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना अनुभवास येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचारयंत्रणेच्या तयारीचा हा आढावा. 

सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचे काटेकोर नियोजन केले आहे. प्रचार रथ, पथनाट्य, कोपरा सभा तर कुठे हायटेक यंत्रणा या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना अनुभवास येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचारयंत्रणेच्या तयारीचा हा आढावा. 

महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारासाठी कोपरा सभा घेण्यावर काँग्रेसचा भर असणार आहे. त्यासाठी काँग्रेस समितीसह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्याक सेलच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. बुधवारी उमेदवार निश्‍चित झाल्यावर कोपरा सभा सुरू होतील. महिला काँग्रेसच्या वतीने प्रत्येक प्रभागात चार कोपरा सभा घेतल्या जातील. युवक काँग्रेसच्या वतीने फेरी काढून मतदारांना आवाहन केले जाईल. पक्षाच्या विविध उपक्रमांच्या माहितीसाठी सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी व्हॉट्‌सॲपवर स्वतंत्र ग्रुप तयार करण्यात आला आहे. प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, बसवराज पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे, खासदार रजनी पाटील, आरिफ खान, माजी केंद्रीय मंत्री गुलाबनबी आझाद, खासदार हुसेन दलवाई यांच्यासह आंध्र प्रदेशातून मोहनबाबू, त्यांचे अभिनेते-अभिनेत्री मुले-मुली, कर्नाटकातून मंत्री एम. बी. पाटील यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. काँग्रेसने केलेली विकासकामे, सरकारच्या नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना झालेला त्रास हे प्रचाराचे मुख्य मुद्दे असणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिली. 

राष्ट्रीय समाज पक्ष करणार डोअर टू डोअर प्रचार
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एकूण सात उमेदवार महापालिका निवडणूक रिंगणात आहेत. पक्षाच्या वतीने डोअर टू डोअर, कॉर्नर सभा व जाहीर सभांचे नियोजन करण्यात येत असून, प्रभागनिहाय प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. 

सोशल मीडियाच्या व्हॉट्‌सॲप, फेसबुक, ट्‌विटर या माध्यमांचा प्रचाराकरिता पुरेपूर वापर केला जाणार आहे. मतदारांना प्रत्यक्ष भेटून महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, रस्त्यावरील खड्डे, पिण्याचे पाणी, हद्दवाढ भागातील पायाभूत सुविधा हे प्रचाराचे मुद्दे असणार आहेत. पक्षाकडून प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी विजयकुमार हत्तुरे, जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, शहराध्यक्ष नितीन शिवशरण, प्रदेश महासचिव बाळासाहेब दोडतले, महिला प्रदेशाध्यक्षा श्रद्धा भातंबरेकर हे स्टार प्रचारक प्रचारात सहभागी होणार आहेत.

भाजपचा ‘सोशल’ फोकस
भाजपने महापालिका निवडणुकीत समाजवार स्वतंत्र मेळावे घेण्यासह समाजमाध्यम (सोशल मीडिया)वर लक्ष केंद्रीत करण्याची रणनीती आखली आहे. प्रचारासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत समाजघटकांशी संवादावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी खास नियोजन सुरू झाले आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्टार प्रचारक असतील. कोपरा सभा, मतदारांच्या थेट गाठीभेटी, पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाईल. वेगवेगळ्या प्रभागांत छोट्या बैठका घेण्यावर भर दिला जाईल. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ‘सोशल’ मीडियाच्या माध्यमातून केलेल्या प्रचाराचा फायदा झाला होता. त्याचा वापर अधिक प्रभावी करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. त्यासाठी पक्षातर्फे वॉर रूम तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले. त्यामुळे कोणत्या प्रभागात प्रचारासाठी कुणाला घेऊन जायचे, याचेही नियोजन पक्षीय पातळीवर सुरू आहे. केंद्रात व राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे. त्यामुळे गेल्या अडीच-पावणेतीन वर्षांच्या काळात दोन्ही सरकारांनी लोकहितासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रचाररथाचा मोह टाळून थेट लोकांत मिसळण्यावर भर दिला जाणार आहे. थेट लोकांमध्ये पोचून अडीच वर्षांत केलेली कामे मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राष्ट्रवादी ‘आपल्या दारी’
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांना मतदारांच्या उंबऱ्यापर्यंत जाण्याची सूचना केली आहे. प्रचाराचे मुख्य तंत्र तेच असेल. शिवाय, प्रमुख पदाधिकारी थेट घरांत जाऊन लोकांशी संवाद साधणार आहेत. 

महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना काय सुविधा दिल्या पाहिजेत, प्रत्यक्षात काय सुविधा मिळतात, याबाबत जनतेशी संवाद साधला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कसे आहेत, त्याचे काम कसे असेल, निवडून आल्यावर ते महापालिकेत कशी भूमिका बजावतील याची माहिती प्रचार मोहिमेतून दिली जाणार आहे. सोलापूर शहर स्मार्ट सिटी झाले आहे, त्या धर्तीवर महापालिकेचे प्रशासन कसे स्मार्ट करता येईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रयत्न करतील, हा मुद्दा जनतेसमोर नेला जाईल. 

घरोघरी प्रचार करतानाच मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत पदयात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील, चित्रा वाघ, नवाब मलिक यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी काय अपेक्षित आहे, याचा ऊहापोह असलेला जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाईल. राष्ट्रवादी आपल्या दारी, असे धोरण असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी सांगितले.

शिवसेनेकडून प्रचाररथ
शिवसेनेकडून सर्व प्रभाग पिंजून काढण्याची तयारी करण्यात येत आहे. यासाठी काही उच्चशिक्षित व्यक्तींचे पथक तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रत्येक प्रभागाला यातील एका व्यक्तीची मदत मिळणार आहे. शिवसेनेकडून प्रचाररथ तयार करण्यात येणार असून या माध्यमातून विविध प्रभागांत हा रथ फिरवून शिवसेनेची बाजू मतदारराजासमोर मांडण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र व्हिडिओ क्‍लिप तयार करण्यात येणार असून ही क्‍लिप संबंधित प्रभागात या रथात एलसीडी लावून त्याद्वारे नागरिकांना दाखविण्यात येणार आहे.

कॉर्नर सभांच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी पक्षाची बाजू मांडणार आहेत. त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यांच्या सभांचेही नियोजन करण्याचा मानस पक्षीय पातळीवरून बोलून दाखविला जात आहे. प्रत्येक प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन मतदारांपर्यंत पोचण्याचे नियोजन शिवसेना करीत आहे.

‘माकप’च्या प्रचारात उतरणार प्रजा नाट्य मंडळाचे पथक
महापालिका निवडणूक प्रचारात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून सर्व उमेदवारांचा एकत्रित प्रचार व्हावा, या दृष्टिकोनातून प्रजा नाट्य मंडळाचे स्वतंत्र प्रचार पथक मैदानात उतरणार आहे. त्यामध्ये पथनाट्य, चळवळीची गाणी, महागाईवरील गाणी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिगामी धोरणांवर टीकास्त्र सोडले जाणार आहे. 

सोलापूर महापालिकेच्या प्रशासन, पदाधिकारी आणि शासन यांच्या त्रिकूट संबंधावरदेखील प्रकाश टाकणारे पथनाट्य सादर केले जाणार आहे. हे कला पथक लाल शर्ट व काळी पॅंट या गणवेशात असणार आहे. सर्व सहा प्रभागांमध्ये ‘माकप’कडून ही प्रचार यंत्रणा राबविण्यात येईल. खास प्रचार रथ तयार आहे. व्हॉट्‌सॲप, फेसबुक, ट्‌विटर, पक्ष वेबसाइट या सोशल मीडियाद्वारे प्रचार होईल. कॉर्नर सभा, जाहीर सभा, गेट मीटिंग, दररोज डोअर टू डोअर प्रचार चालेल. माजी आमदार नरसय्या आडम, ॲड. एम. एच. शेख स्टार प्रचारक असतील. अखिल भारतीय जनवादी संघटनेच्या महासचिव मरियम ढवळे या १२ व १३ फेब्रुवारी रोजी प्रचारात सहभागी होतील.

मनसे घालणार भावनिक साद
‘एकटा पडलाय राजा, तुमच्या राजाला साथ द्या’ या प्रचार गीताप्रमाणेच मनसे प्रचारात भावनिक साद घालणार आहे. महापालिका निवडणुकीची संपूर्ण रणनीती मुंबईतून निश्‍चित केली जाणार आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी येथील नेत्यांवर असणार आहे. येथे प्रचारपत्रके मुंबईतून मागविण्यात येणार आहेत. व्हॉटस्‌ॲप, फेसबुक अशा सोशल मीडियावर युवा उमेदवारांनी काही ग्रुप काढून राज ठाकरे यांना संधी द्या, अशी भावनिक साद घातली आहे. विकासकामे करण्यासाठी संधी द्या, असे स्लोगन आहे. 

सोशल मीडिया हाताळण्याची जबाबदारी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्यावर आहे. ब्रॉडकॉस्टिग ग्रुपद्वारे ‘नाशिक पॅटर्न’चा ढोल जोरात पिटला जात आहे. विकास कसा साधला पाहिजे, याचे उदाहरण दिले जात आहे. मनसेचे ४० स्टार प्रचारक आहेत, यातील सोलापुरात कोण येणार, याकडे लक्ष असणार आहे. राज ठाकरे सभा घेणार, अशी जोरदार चर्चा आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्नही केले जात आहेत. उमेदवार अनिल भिसे आणि राहुल पाटील हे सोशल मीडियावर प्रचार करण्यात अग्रेसर आहेत. 

बसपचा ‘हायटेक’ प्रचार
महापालिका निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी हायटेक प्रचार करणार आहे. ट्रॅव्हलींग डॉल्बी, स्क्रीन रथ ही वैशिष्ट्ये असतील. सोशल मीडियाचा खुबीने वापर केला जाईल. वाट्‌सॲप व फेसबुकवर भूमिका मांडल्या जातील. 

ट्रॅव्हलींग डॉल्बी हा नवा प्रयोग केला जाईल. एका वाहनात ध्वनी यंत्रणा असेल. त्याच्या माध्यमातून पक्षाचे संस्थापक काशिराम व राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या भाषणे मतदारांना ऐकवली जातील. पक्षाच्या घोषणा, पक्षाचे महत्त्व सांगणारी गाणी वाजविली जातील. स्थानिक नेते या रथातूनच भाषण करतील. 

स्क्रीन रथाच्या माध्यमातून ध्वनिचित्रफीती दाखवल्या जातील. विद्यमान नगरसेवकांनी कोणती कामे केली, याचे चित्रण त्यात असेल. उमेदवाराची ओळख, त्यांची भूमिका विशद करणारा व्हीडीओ प्रसारात केला  जाईल. संस्थापक काशिराम, मायावती यांची भाषणे स्क्रीनवर पहायला मिळतील. रांगोळी कलेचा प्रभावी वापर होईल. प्रचार बैठका, सभेच्या ठिकाणी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील रांगोळी कलाकार रांगोळी रेखाटतील. रांगोळीमधून पक्षाचे चिन्ह, बहुजन महापुरुष यांचे चित्रचरित्र रेखाटले जाईल.

‘एमआयएम’चा सभांवर जोर 
महालिका निवडणुकीत एमआयएमच्या प्रचाराचा बार आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांच्या सभेने उडाला. शहरात वातावरण निर्माण झाले. होटगी रस्त्यावरील लोकमान्यनगर पक्षाचे खास प्रचारमैदान बनलेय. पुढील प्रचाराचे नियोजन करताना गुप्तता पाळली जात आहे. जेणेकरून विरोधकांना कोणताही अंदाज लागू द्यायचा नाही, असे धोरण आहे.

पक्षाकडून प्रचारयंत्रणेविषयी अत्यंत गुप्तता पाळण्यात आलीय. सोशल मिडियाचा वापर मर्यादितच असेल. खजिनदार याकूब शेख यांनी एक वॉट्‌सअप ग्रुप काढला आहे, मात्र तो संथ आहे. खासदार ओवेसी यांची सभा घेण्याचे नियोजन सुरु आहे. ओवेसी बंधूंची सभा आणि शहरातून फेरी काढण्याचे नियोजन दिसतेय. शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी तसे सांगितले. ओवेसी यांच्या सभा ही पक्षाच्या प्रचाराची ताकद असणार आहे. त्यांच्या तारखा मिळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सरचिटणीस कोमारो सय्यद यांनी सांगितले. शहरातून पदयात्रा काढण्यास पोलीसांकडून परवानगी घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील, तेलंगणाचे आमदार मो. अहमद खान, भायखळाचे आमदार वारीस पठाण, तसेच हैदराबादचे तीन आमदार आणि पक्ष निरीक्षक खाजा बिलाल यांची सभा होणार आहे.

रिपाइंचे  ‘होम टू होम’
महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ‘होम टू होम’ प्रचार करणार आहे. या निवडणुकीत नऊ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचाराला सुरवात केली आहे, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी दिली.
पक्षाला अधिकृत निवडणूक चिन्ह नाही. निवडणुका कार्यालयाकडून बुधवारी चिन्ह निश्‍चित केले जाईल. त्यानंतर चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोचविण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. पक्षाचा प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत स्वतः जाणार आहे. हॅंडबिलच्या माध्यमातून पक्षाची भूमिका व चिन्हाचा प्रचार केला जाईल. निवडणूक चिन्हाची घोषणा झाल्यानंतर प्रचाराला आणखी वेग येईल. कॉर्नर बैठकांचे नियोजन आहे. ज्या भागात उमेदवार उभा आहे, त्या भागात जास्तीत जास्त कॉर्नर बैठका होतील. तरुणाईला भूमिका पटवून देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. व्हॉट्‌सॲप व फेसबुकच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोचण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rally, meeting,High-tech election campaign