रामभाऊंची कात्री, दहा तोळे सोन्याची !

रामभाऊंची कात्री, दहा तोळे सोन्याची !

कोल्हापूर - शेतकरी नवरा नको, पारंपरिक व्यवसाय करणारा नवरा नको...किती दिवस ऐकून घ्यायचं हे सारं...कुठल्याही नोकरीपेक्षा पारंपरिक व्यवसाय नेहमीच चांगला असतो आणि त्याबळावर इतरांना रोजगाराबरोबरच स्वतःचे करिअरही उत्तम घडू शकते...असा संदेश देण्याची वेळ आता आली आहे. म्हणूनच मग सोन्याची कात्री तयार करण्याचा निर्णय घेतला. येत्या गुढीपाडव्याला १९ तोळे वजनाच्या या कात्रीचे काम पूर्ण होणार आहे. समाजबांधवांसाठी रोज बारा ते पाच या वेळेत ती पाहण्यासाठीही खुली ठेवणार आहे...सलून व्यावसायिक रामचंद्र संकपाळ ‘सकाळ’शी भरभरून बोलत होते. 

दरम्यान, राजारामपुरी १२ व्या गल्लीत श्री. संकपाळ यांचे मिरर हेअर ब्युटी या नावाचे सलून असून, गेली ३६ वर्षे ते या व्यवसायात आहेत. राजारामपुरी नवव्या गल्लीतील मदन दत्तात्रय कारेकर सराफ यांच्याकडे कात्री तयार करण्याची लगबग सध्या सुरू आहे.  

श्री. संकपाळ महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ संघटनेचे शहराध्यक्ष असून, नाभिक दुकानमालक संघटनेचे खजानीस म्हणूनही कार्यरत आहेत. लग्नसराईत एकाचवेळी अधिक मुहूर्त असले तर कोल्हापुरी फेटे बांधणारी मंडळी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी त्यांनी सहकाऱ्यांसह संघटनेच्या माध्यमातून फेटे बांधण्याच्या प्रशिक्षणाची संकल्पना पुढे आणली आणि ती यशस्वीही केली. या प्रशिक्षणातून कैक कोल्हापूरकर कोल्हापुरी फेटा बांधायला शिकले. 

ते सांगतात, ‘‘माझ्या मुलाला पारंपरिक व्यवसायापेक्षा नोकरी लावा, असा अनेकांनी सल्ला दिला, पण मुलाला पारंपरिक व्यवसायाचे महत्त्व आणि त्यातील करिअरविषयी समजावून सांगितल्यानंतर तोही आता या व्यवसायातच आला आहे. या क्षेत्रातील अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली आहे.’’
सोन्याच्या कात्रीने रोज केस कापणे अजून तरी अशक्‍य वाटते. कारण कात्रीला वारंवार धार लावावी लागते. मात्र, काय करता येईल, यावर विचार सुरू आहे. लहान मुलांच्या जावळांसाठी या कात्रीचा नक्कीच वापर करणार असल्याचेही ते सांगतात. 

प्रसिद्ध सराफ मदन कारेकर म्हणाले, ‘‘नऊ इंच लांबीची ही कात्री असून, दहा तोळे वजनाची असेल. अशा पद्धतीचे काम करण्याची ही संधी वारंवार येत नाही. त्यामुळे ही कात्री अधिक कलात्मक करण्यावर भर देणार आहे.’’ 

समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या निमित्ताने गलेलठ्ठ पगाराचा नोकरीवालाच पाहिजे, ही मानसिकता वारंवार दिसून येते. त्यामुळे आमच्या समाजबांधवांसाठी सोन्याचे दिवस आणणारी सोन्याची कात्री तयार करण्याचा निर्णय घेतला.
-रामचंद्र संकपाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com