रामदास आठवलेंकडून पूरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविलेला नद्याजोड प्रकल्प गेल्या 60-65 वर्षांत राबविला असता, तर अशी वेळ आली नसती.

कोल्हापूर : "पुराची गंभीर स्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्यास हरकत नाही. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात राज्य शासनाने आराखडा तयार करावा. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी विशेष निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करू. पूर ओसरल्यानंतर कायमस्वरूपी मदतीसाठी पाठपुरावा करणार असून, खासदार फंडातून कोल्हापूर व सांगलीसाठी 50 लाखांचा निधी देणार असल्याची माहिती आज (सोमवार) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली. 

कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी आठवले आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. पूरग्रस्त कुटुंबांची पाहणी केल्यानंतर शाहू मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक केंद्र आणि शासकीय विश्रामगृहावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

आठवले म्हणाले, "पुरामध्ये अनेकांची घरे पाण्याने भरली, काही जण बेघर झाले. अशांना निवारा केंद्रात यावे लागले आहे. अशात पूरग्रस्तांचे तातडीने पंचनामे करावे लागतील. ज्या भागात पूर सतत येतो, लोकांची घरे पाण्यात जातात, त्यांना बेघर व्हावे लागते. लहान मुले, वृद्ध, महिलांचे हाल होतात, हे थांबले पाहिजे. त्यासाठी अशात दुर्बल घटकांना पुनर्वसन करण्याला प्राधान्य द्यावे लागेल. केंद्र सरकारच्या विविध गृह योजना, आवास योजनांचा लाभ गरजू घटकांना तातडीने देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.'' 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविलेला नद्याजोड प्रकल्प गेल्या 60-65 वर्षांत राबविला असता, तर अशी वेळ आली नसती. प्रशासनाच्या सोबत कोल्हापूरकरही मदतकार्यात अग्रेसर आहेत. कोल्हापूरकरांच्या दातृत्वाला सलाम असल्याचेही आठवले म्हणाले. विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी. त्याशिवाय खासदार, आमदार, उद्योजक यांनीही पुढे येऊन मदत करावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athawale announces Rs 50 lakh from MP fund for relief work