कोल्हापुरातील सांडपाणी प्रकल्पासाठी १२ कोटी देणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

नमामि पंचगंगा उपक्रमांतर्गत १०८ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. जिल्ह्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १२ कोटी रुपये देण्यात येतील. त्यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेने तातडीने प्रस्ताव द्यावा; तत्काळ निधी दिला जाईल,

- रामदास कदम

कोल्हापूर - नमामि पंचगंगा उपक्रमांतर्गत १०८ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. जिल्ह्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १२ कोटी रुपये देण्यात येतील. त्यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेने तातडीने प्रस्ताव द्यावा; तत्काळ निधी दिला जाईल, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयातील बैठकीत केली. 

आमदार अमल महाडिक व उल्हास पाटील यांनी पंचगंगा प्रदूषणमुक्तीबाबत उपाययोजना राबविण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार श्री. कदम यांच्या कक्षात बैठक झाली. त्यावेळी चर्चेत पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे कोल्हापूर तसेच इचलकरंजी येथील नागरी आरोग्य धोक्‍यात आले आहे, महापालिका तसेच जिल्हा परिषद यांनी सांडपाणी नदीत मिसळू नये, यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचे निश्‍चित केले; मात्र निधी नसल्याने तसेच तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प रखडला आहे. ही स्थिती जाणून घेत श्री. कदम यांनी पंचगंगा नदीत कोणत्याही मोसमात एक टक्काही सांडपाणी जाता कामा नये, अशा सूचना महापालिका, जिल्हा परिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

इचलकरंजी येथील प्रोसेसचे पाणी काळ्या ओढ्यामधून पंचगंगेत मिसळते. त्यामुळे इचलकरंजीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. याची दखल घेऊन प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत घटकांवर तातडीने कारावाई करावी, अशी मागणी उल्हास पाटील यांनी केली. नदी प्रदूषण रोखण्याबाबत असलेल्या अडचणी तत्काळ दुरुस्त कराव्यात, शहरातील सांडपाणी प्रकल्पासाठी १० कोटी व जिल्हा परिषदे अंतर्गत सांडपाणी प्रकल्पासाठी दोन कोटींचा प्रस्ताव तातडीने शासनाला सादर करावा, त्यासाठी निधी देऊ, असे आश्‍वासन मंत्री कदम यांनी दिली. जयसिंगपूर, कोल्हापूर, इचलकरंजी, कुरुंदवाड, हुपरी, पेठवडगाव नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तसेच शिरोळचे प्रसाद धर्माधिकारी आदी उपस्थित होते. 

प्रदूषणमुक्तीस गती येणार 
नमामि पंचगंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १०८ कोटींचा निधी लागणार आहे. तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. करवीर तालुक्‍यातील नदीकाठच्या गावांतून सांडपाणी मिसळते. त्या गावांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी नुकतीच पाहणी झाली. त्यानुसार आरखडा तयार केला; पण यंत्रसामग्रीसाठी निधी नव्हता. निधी मिळाल्यास काम तातडीने मार्गी लागून पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यात यश मिळविता येणे शक्‍य होणार आहे.

... तर पालिकांवर कारवाई 
कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरासह औद्योगिक वसाहतींच्या सांडपाण्यामुळे पंचगंगा प्रदूषित झाली आहे. एसटीपी प्रकल्प कार्यान्वित न केल्यास या पालिकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कदम यांनी बैठकीत दिला. ते म्हणाले, ‘‘येणाऱ्या अधिवेशनापूर्वी पंचगंगा नदीकाठावरील गावांनी ज्या उद्योगांमुळे प्रदूषण वाढते, त्यांचा अहवाल शासनाला सादर करावा. पंचगंगा प्रदूषणास उद्योगही कारणीभूत आहेत. त्यामुळे अधिवेशनापूर्वी उद्योगांची बैठक घेऊन प्रदूषण कमी करण्यात येईल.’’ 

 

Web Title: Ramdas Kadam comment