रामदेवबाबांच्या मानपत्रावरून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर 

Ramdevbaba
Ramdevbaba

सोलापूर : योगगुरू रामदेवबाबा यांना महापालिकेच्या वतीने मानपत्र देण्यावरून भाजपमधील नगरसेवकांनीच पक्षातील पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. ठराव नसतानाही मानपत्र देण्याचा हट्ट धरला गेला, मात्र त्याची कार्यवाही करतानाही ठराविक लोकांना घेऊन मानपत्र देण्यात आल्याची टीका सोशल मिडीयावरून भाजप नगरसेवकांकडूनच होत आहे. 

भाजपमधील गटबाजीचे स्वरुप पाहता, पालकमंत्री गटातील नगरसेवकाने ही टीका केली असती तर गटबाजीचा एक प्रकार म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता आले असते. पण सहकारमंत्र्यांचे कट्टर समर्थक असलेल्या राजेश काळे यांनीच या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिकेत जो सावळा गोंधळ चालला आहे त्यास आता नगरसेवकही कंटाळल्याचे दिसून येत आहे. हे मानपत्र महापालिकेच्या वतीने होते की एका गटाच्या वतीने असा प्रश्‍नही काळे यांनी उपस्थित केला आहे. मानपत्र देताना किमान सभागृहनेते आणि आयुक्त तरी उपस्थित आवश्‍यक होते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

महापालिकेच्या वतीने मानपत्र दिले जाणार असेल तर, मानपत्र प्रदान करतेवेळी महापौर पदासाठी असलेले "गाऊन' घालणे आवश्‍यक असते. मात्र बनशेट्टी यांनी ते घातले नव्हते. मानपत्र देण्याचा ठराव झाला नसला तरी, विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही ठरावाशिवाय मानपत्र देण्यास संमती दिली होती. त्यामुळे त्यांनाही मानपत्र देतेवेळी बोलावणे आवश्‍यक होते. ठराव न झाल्यामुळे आयुक्त गैरहजर असणे स्वाभाविक होते. ठराव झाला नसतानाही, "महापौरांच्या आदेशाची अंमलबजावणी करा' असे लेखी फर्मान सोडणारे नगरसचिव तरी व्यासपीठावर अपेक्षित होते. ठराव झाल्याशिवाय मानपत्र देता येत नाही असे महापालिकेच्याच विधी सल्लागारांचे मत आहे, मग ज्या पदावर बसल्यावर कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्‍यक आहे, त्या नगरसचिवपदावर बसलेला व्यक्ती बेधकड, "अंमलबजाव'णीचे आदेश देतो हे प्रशासनावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे द्योतक आहे. प्रत्येक गोष्ट "कायद्या'नुसारच करणार म्हणणारेही मूग गिळून गप्प आहेत. 

कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणारी व्यक्ती वस्तुस्थिती निर्भिडपणे सांगून समोरच्या भल्याभल्यांची बोलती कशी बंद करू शकतो, हे राजेशकुमार मीना, एम. एस. देवणीकर, एस. व्ही. आर. श्रीनिवास आणि सौरभ राव आयुक्त असताना साऱ्या सभागृहाने अनुभवले आहे. आता मात्र कुणाचा ताळतंत्र कुणाला नाही. कुणही उठतो, स्वतःच्या मनाप्रमाणे वागतो. या प्रकारास विरोधी पक्षही जबाबदार आहे, कारण अलिकडे ते फारच "सबुरी'ने घेऊ लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com