भाजप-रमेश जारकीहोळींत संघर्षाची चिन्हे; विधान परिषदेत पक्षाचा पराभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

भाजप-रमेश जारकीहोळींत संघर्षाची चिन्हे; विधान परिषदेत पक्षाचा पराभव

बेळगाव : विधानपरिषद निवडणूक निकालाचे दूरगामी परिणाम बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर पडणार आहेत. या निकालाचा सर्वाधिक फटका गोकाकचे आमदार व माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना बसेल, अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. कॉंग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात जाऊन मंत्री झालेले रमेश गेल्या काही महिन्यांपासून नाराज आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून आपल्यावर अन्याय होतोय अशी त्यांची भावना आहे. ही नाराजी त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली नसली तरी आता विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार व आपले बंधू लखन यांना निवडून आणले आहे. याचा फटका भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना बसला आहे. त्यामुळे आता भाजपकडून रमेश यांच्याबाबत कोणती भूमिका घेतली जाणार याबाबतची उत्सुकता जिल्‍ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा: 'हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांच्या पंगतीत बसलेल्यांना बोलण्याचा अधिकार नाही'

बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी पीएलडी बॅंकेच्या निवडणुकीत रमेश यांचे बिनसले. त्यानंतर रमेश यांनी सातत्याने कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या काही आमदारांना सोबत घेऊन त्यानी ऑपरेशन कमळ यशस्वी केले व राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडविले. त्यानंतर पोटनिवडणुकीत ते भाजपकडून निवडून आले. बी. एस. येडीयुराप्पा मुख्यमंत्री असताना त्यांना पाटबंधारे मंत्रीपद व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही मिळाले. पण सतत वादग्रस्त वक्तव्य करून भाजपमध्ये अनेकांचे शत्रूत्व त्यांनी ओढवून घेतले.

मार्च २०२१ मध्ये सीडी प्रकरणामुळे ते अडचणीत आले. या प्रकरणात त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. पुन्हा मंत्रीपद मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, पण यश आलेले नाही. लोकसभा पोटनिवडणुकीत मंगला अंगडी यांना निवडून आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली तरीही पक्षाने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांची नाराजी वाढली व या नाराजीतूनच त्यांनी आपले बंधू लखन यांना विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरविले. पण लखन यांच्यामुळेच भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला हे उघड सत्य आहे. त्यामुळेच रमेश यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: कर्नाटकात 12 जागा मिळवत भाजपची जोरदार मुसंडी; कॉंग्रेसला मिळाल्या 11 जागा

राज्यातील नेते घेणार दखल

निवडणूक काळात रमेश व भाजपचेच आमदार असलेले त्यांचे बंधू भालचंद्र यांनी महांतेश कवटगीमठ यांना निवडून आणण्याचा विश्‍वास व्यक्त केला होता, पण प्रत्यक्षात मात्र तसे घडलेले नाही. कवटगीमठ यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बेळगावला आले होते, त्यावेळी त्यांच्या बैठकीत रमेश सहभागी झाले होते. पण पडद्यामागे राहून त्यांनी लखन यांच्या विजयासाठी प्रयत्न केले हे लपून राहिलेले नाही. त्यामुळेच भाजपमधील यापुढची त्यांची वाट खडतर असेल हे नक्की आहे. अधिवेशनामुळे बेळगावात सर्व नेते असल्याने याचे पडसाद नक्की उमटतील, अशी शक्यता आहे.

Web Title: Ramesh Jarkiholi Oppose Bjp Political Changes In Belgaum District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KarnatakaBjp