शिक्षणाची "रामपूरवाडी एक्‍स्प्रेस' (video)

दौलत झावरे
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

जपानमध्ये एका ठिकाणी रेल्वेच्या डब्यामध्ये शाळा भरवली जात होती. तेत्सुको कुरोयानागी यांनी या रेल्वेतील शाळेबाबत "तोत्तोचान' नावाचे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचा अनुवाद चेतना सरदेशमुख यांनी केला आहे. ते पुस्तक रामपूरवाडीतील शिक्षकांच्या वाचण्यात आले.

नगर : विद्यार्थी रोज झुकझुक गाडीत बसतात नि शिक्षणाच्या गावाला जातात. ते सोशल मीडियातून एकमेकांसोबत कनेक्‍ट आहेत. डिजिटलमुळे ते तंत्रज्ञानावर स्वार झालेत. विद्यार्थी हसतखेळत शिक्षण घेत असल्याने त्यांची मज्जा असते... हा स्मार्टनेस कुठल्या इंग्रजी माध्यमातील शाळेचा किंवा सीबीएसई पॅटर्नच्या स्कूलचा नाही, तर ही आहे राहाता तालुक्‍यातील रामपूरवाडीची जिल्हा परिषद शाळा. 

हुबेहूब रेल्वे भासते

ही शाळा अध्यापनात तर अव्वल आहेच; परंतु ती प्रेक्षणीयही आहे. या शाळेला 2016मध्येच "आयएसओ' मानांकन मिळालेय. सॉफ्टवेअरचा वापर करून विद्यार्थ्यांना इंग्रजीचे अध्यापन केले जाते. या शाळेला रेल्वेचे स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत नव्हे, तर रेल्वेत बसल्याचा भास होतो. बाहेरून तर ही शाळा हुबेहूब रेल्वे भासते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवनाथ गायके पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेने हा पल्ला गाठला आहे.

कशी सुचली कल्पना?

जपानमध्ये एका ठिकाणी रेल्वेच्या डब्यामध्ये शाळा भरवली जात होती. तेत्सुको कुरोयानागी यांनी या रेल्वेतील शाळेबाबत "तोत्तोचान' नावाचे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचा अनुवाद चेतना सरदेशमुख यांनी केला आहे. ते पुस्तक रामपूरवाडीतील शिक्षकांच्या वाचण्यात आले. एका चित्रकाराला बोलवून त्याला संकल्पना सांगितली. त्याने रेल्वे डब्यासारखा रंग शाळेला दिला. रेल्वे कोडऐवजी डाईस कोड, नेमप्लेट ऐवजी केंद्र ते तालुका असा उल्लेख केला आहे.

rampur express

लोगोवर शाळेचे नाव कोरण्यात आले. खिडक्‍या उघडल्या तरी रेल्वेसारख्या खिडक्‍या दिसतील असे रंगकाम आहे. त्यामुळे शाळेचे "रामपूरवाडी एक्‍स्प्रेस' असे नामकरण केले आहे. सव्वा लाखाच्या लोकवर्गणीतून शाळेला हे एक्‍स्प्रेसचे रुपडे लाभले आहे. 

rampur express

राबविले जाणारे उपक्रम

पालकांशी व्हॉट्‌सऍप ग्रुपवरून चर्चा, ग्रंथालय, प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्हीद्वारे अध्यापन, विद्यार्थ्यांना परिपाठात संधी, कचराव्यवस्थापन, कल्पक व नावीन्यपूर्ण खेळ, वृक्षारोपण, तसेच आरटीआयच्या सर्व निकषांची पूर्तता केली जाते. शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे आदींनी शाळेचे कौतुक केले. पहिली ते चौथीपर्यंत वर्ग येथे आहेत. पटसंख्या 153 आहे. मुख्याध्यापकांसह सात शिक्षक कार्यरत आहेत. 

rampur express

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rampurwadi Express of Education