रंकाळा टॉवरचे होणार जतन व संवर्धन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मार्च 2019

दीडशे वर्षांपूर्वी रंकाळा टॉवर व येथील प्रमुख प्रवेशद्वार जसे होते, अगदी हुबेहूब त्या पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न राहणार आहे. मूळ कामाला धक्का न लावता कोणतेही बांधकाम काँक्रिटीकरण न करता या ऐतिहासिक, हेरिटेज वास्तू मजबूत करण्याचा हेतू राहील. 
- सुरत जाधव, आर्किटेक्‍ट.

कोल्हापूर - कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा तलाव परिसर संवर्धन कामांना आता प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात रंकाळा टॉवरचे जतन व संवर्धन तसेच संरक्षक दगडी भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी १३ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. 

शहरवासीयांचा श्‍वास असलेल्या रंकाळा तलावाचे जतन व संवर्धन करणे, रंकाळा परिसर विकसित करणे, यासाठी सुमारे ४ कोटी ८० लाख रुपये निधी शासनाने मंजूर केला आहे. त्यापैकी एक कोटी १३ लाख रुपये निधी प्रत्यक्ष उपलब्ध झाला आहे. त्यातून रंकाळा तलावाचा प्रमुख भाग असलेल्या टॉवरचे जतन व संवर्धन केले जाणार आहे.

टॉवरला व टॉवर शेजारी नक्षीदार भिंत आहे, त्यात कुठेही चिरा गेल्या असतील तर त्या भरल्या जाणार आहेत. नक्षीदार दगड फुटला असेल तर त्याच पद्धतीने दगड घडवून तो बसविला जाणार आहे. रंकाळा चौपाटीवर जाण्यासाठी येथून पायऱ्यांची वाट आहे, ते प्रवेशद्वारापूर्वी जसे होते त्याच पद्धतीने ते करणार आहेत. रंकाळा टॉवरपासून नवनाथ मंदिरापर्यंत जी संरक्षक भिंत आहे त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. पूर्वी ज्याप्रमाणे संरक्षण भिंतीवर जसे नक्षीदार दगड होते त्याप्रमाणे ते घडवून बसवले जाणार आहेत. संरक्षण भिंत मजबूत केली जाईल.

यापूर्वी शालिनी पॅलेस समोरील संरक्षक भिंत ढासळली होती. ती पूर्वीसारखीच मजबूत उभा करण्याचे काम कॉन्ट्रॅक्‍टर व्ही. के. पाटील यांनी केले होते. आता होणारे रंकाळा टॉवर व भिंतीचे कामही तेच करणार आहेत.

दीडशे वर्षांपूर्वी रंकाळा टॉवर व येथील प्रमुख प्रवेशद्वार जसे होते, अगदी हुबेहूब त्या पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न राहणार आहे. मूळ कामाला धक्का न लावता कोणतेही बांधकाम काँक्रिटीकरण न करता या ऐतिहासिक, हेरिटेज वास्तू मजबूत करण्याचा हेतू राहील. 
- सुरत जाधव,
आर्किटेक्‍ट.

लोकांचेही योगदान हवे 
रंकाळा टॉवरच्या जागेत दरवर्षी येथील ग्रुप विविध कार्यक्रम करतात. या कार्यक्रमासाठी टॉवर परिसराची मोडतोड होते. त्यामुळे आता विकासकामे झाल्यावर रंकाळा परिसराचे जतन व संवर्धन करण्यात तरुणांसह लोकांनीही योगदान द्यायला हवे. महापालिका प्रशासनानेही योग्य ती देखरेख करण्याची गरज आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rangala Tower will save and conservation