कोरड्या रंगांतही चिंब भिजले स्नेहाचे नाते...! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

कोल्हापूर - माणसांतील नात्यांत रंग भरत रंगपंचमीचा फ्रायडे आज जल्लोषात साजरा झाला. सप्तरंगांत न्हाऊन निघालेल्या चेहऱ्यांनी कोरड्या रंगांचा वापर करत "पाणी वाचवा'चा संदेश दिला. सामाजिक उपक्रमांची जोड मिळाल्याने पर्यावरणपूरक रंगपंचमीचा थाट तर न्यारा ठरलाच, शिवाय बालचमूंपासून तरुणाई, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साहालाही उधाण आले. 

सूर्यकिरणांच्या साक्षीने शहरातील गल्ली-बोळात बालचमूंचा कलकलाट सुरू झाला. एकमेकांच्या चेहऱ्यांवर रंग फासून रंगांची उधळण सुरू झाली. रासायनिक रंगांना फाटा देऊन विविध संस्था, संघटना व मंडळांनी पर्यावरणपूरक रंगपंचमीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, कोरड्या रंगांचा अधिक वापर झाला. 

पाणीटंचाईला सामोरे जायला लागू नये, यासाठी जाणीवपूर्वक पाण्याचा वापर टाळण्यात आला. रंगपंचमी म्हटले, की डॉल्बीच्या तालावर चौका-चौकात थिरकणारी पावले, हे समीकरण कमी झाल्याचे दिसून आले. दुचाकी गाड्यांवर रंगांची पोती घेत तरुणाई मित्र-मैत्रिणींना रंग लावण्यासाठी फिरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. गाड्यांवरून पाण्याचे फुगे अंगावर भिरकावणे, अंडी फेकणे या प्रकारांना फाटा देण्यात आला. महिलांनी घरातील कामे दहापर्यंत आटोपून रंगपंचमीत रंग भरला. चौका-चौकात तरुणाईचे जथ्थे थांबून होते. कोठे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलिस यंत्रणा कार्यरत होती. 

उपनगरांमध्ये जल्लोषी वातावरणात रंगपंचमीचा रंग भरला. या वेळी महिलांनी एकत्र येऊन रंगपंचमीचा आनंद लुटला. दुपारी तीननंतर तरुणाईचे जेवणाचे बेत सुरू झाले. सोनतळी, राजाराम बंधारा, कात्यायनी डोंगर, पन्हाळा, गगनबावडा परिसरांत तरुणाईने रस्सामंडळ केला. दिवसभरात रंगपंचमीत थकलेल्यांनी रात्री हॉटेल्समध्ये जाऊन तांबड्या-पांढऱ्या रश्‍श्‍यावर ताव मारला. 

व्हॉट्‌स-ऍपवर हॅपी रंगपंचमीचे मेसेज आज फिरत राहिले. काहींचे डीपी रंगाने माखलेल्या चेहऱ्यांनी सजले. फेसबुकवर मित्र-मैत्रीणी, कुटुंबीय यांच्यासमवेत साजऱ्या केलेल्या रंगपंचमीचे फोटोही शेअर करण्यात आले होते. 

Web Title: rangpanchmi celebration in kolhapur