Ranjit Singh Mohite Patil
Ranjit Singh Mohite Patil

Loksabha 2019 : मोहिते पाटलांनी साथ सोडल्याने राष्ट्रवादीचे अस्तित्व धूसर

अकलूज : माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रवेशाने माळशिरस तालुका भाजपमय झाला आहे. त्यांच्यासोबत पंचायत समितीच्या सभापतीं, उपसभापती, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व सदस्य भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसचे अस्तित्व धूसर झाले आहे. या परिस्थितीत सद्या तरी माळशिरस तालुका राष्ट्रवादीमुक्तच झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.२०) रणजितसिंहांनी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी मान्यवरांसह राज्यातील मोहिते पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, तालुका अध्यक्ष संग्रामसिंह जहागिरदार, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा अध्यक्ष ऍड. वजीर शेख यांच्यासह १४ जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यानी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोहिते पाटलांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुक्यातील अस्तित्व आज तरी संपुष्टात आल्याचे दिसत आहे आणि येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेत देखील मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

रणजितसिंहांमुळे भाजपला अच्छे दिन
1999 साली खासदार विजयसिंह मोहिते पाटलांनी कॉग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर तालुक्यातून कॉग्रेसचे निशानच हद्दपार झाले होते. त्यानंतर तालुक्यात आजपर्यंत कॉग्रेस बाळसे धरू शकलेली नाही. या कठीण काळात कॉग्रेसचे अस्तितव टिकवून ठेवण्यासाठी प्रकाश पाटील (पानीव) पुढे आले. समोर दारुण पराभव दिसत असताना कॉग्रेसच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली  त्यांच्या पत्नी श्रीलेखा पाटील यांच्या रूपाने पंचायत समितीत व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी कॉग्रेसचे टिकवून ठेवले. आता श्री पाटील हे कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तर, ऍड रामहरी रूपनवर विधान परिषदेचे सदस्य आहेत. खासदार विजयसिंहांनी कॉग्रेस सोडल्यावर  कॉग्रेसची बिकट होऊन राष्ट्रवादीला अच्छे दिन आले होते. आता रणजितसिंहांनी राष्ट्रवादी कॉग्रेस सोडून भाजप मध्ये प्रवेश केल्याने भाजपला अच्छे दिन आले आहेत. या कठीण काळात आता राष्ट्रवादी कॉग्रेसचे निशान हाती घेण्यासाठी कोण पुढे सरसावणार आहे ते पहावे लागणार आहे.

पंचायत समितीत भाजपची सत्ता
पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सर्व सदस्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने पंचायत समितीमधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात येऊन भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे. तालुक्यात राष्ट्रवादीचे आठ जिप सदस्य आहेत. हे सर्वजन रणजितसिंहांच्या भुमिकेसोबतच आहेत मात्र, तांत्रिक कारणामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. या परिस्थितीत तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचा एकही पं.स. व जिल्हा परिषद सदस्य राहिलेला नाही असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

रणजितसिंहांसोबत, शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते पाटील, पं.स.च्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, पंस. सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, उद्योजक किर्तीसिंह मोहिते पाटील, यशवंतनगरच्या सरपंच देवश्री मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोहिते पाटील परिवारातील या तरूण नेत्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी क्षीण झाली आहे तर, भाजपला मोठे बळ मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com