जातीत घेण्यासाठी मागितली 27 लाखांची खंडणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

जातपंचायतीने जातीबाहेर काढल्याने स्वतःसह नातेवाइकांच्या दहा कुटुंबीयांच्या उपवर मला-मुलींचे विवाह रखडले. जातपंचायतीचे लोक लग्न जमू देत नाहीत. जातीत घेण्यासाठी जातपंचायतीला 27 लाख रुपये कोठून द्यायचे? त्रास व खंडणीच्या मागणीला कंटाळून मी पोलिसात फिर्याद दिली.
- माणिक हनुमंता हाटकर

तळेगाव दिघे (नगर) - आंतरजातीय विवाह केलेल्या एका तरुणासह नातेवाइकांच्या दहा कुटुंबांना बहिष्कृत केल्याच्या आणि पुन्हा जातीत घेण्यासाठी 27 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून तिरमली (नंदीवाले) समाज जातपंचायतीच्या दहा पंचांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना अटक झाली असून, अन्य आरोपींना लवकरच अटक होईल, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.

आरोपींपैकी गंगाराम वेंकट मले (रा. श्रीगोंदे फॅक्‍टरी) व रामा साहेबराव फुलमाळी (रा. ओझर, ता. जुन्नर, जि. पुणे) यांना आज अटक करण्यात आली. त्यांना शुक्रवारपर्यंत (ता.9) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पारेगाव खुर्द (ता. संगमनेर) येथील माणिक हनुमंता हाटकर (वय 28) या तिरमली समाजातील तरुणाने मे 2010मध्ये आंतरजातीय विवाह केला. त्यानंतर झरेकाठी (ता. संगमनेर) येथे झालेल्या जातपंचायतीत पंचांनी माणिकसह त्याच्या नातेवाइकांच्या दहा कुटुंबांना जातीतून बहिष्कृत केले. माणिक व त्याच्या कुटुंबीयांनी जातीत घेण्यासाठी पंचांना विनवण्या केल्या. त्यांना पुन्हा जातीत घेण्यासाठी गेल्या वर्षभरापासून वाटाघाटी सुरू होत्या. दहा कुटुंबांना पुन्हा जातीत घेण्यासाठी जातपंचायतीने तब्बल 27 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी वेळोवेळी केली. ही रक्कम कोठून आणायची, या विवंचनेत असलेल्या माणिकने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष रंजना गवांदे यांच्याकडे कैफियत मांडली. त्यानंतर त्याने सोमवारी (ता.5) जातपंचायतीविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली.

Web Title: ransom demand for caste entry